मुंबई : मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे आज मिठी नदी खालील १.५ किमी लांबीचे भुयार पूर्ण करण्यात आले. टेराटॅक-निर्मित गोदावरी-४ या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे बीकेसी ते धारावी पर्यंतचे १.५ किमी अंतर पूर्ण केले. बीकेसी येथील लाँचिंग शाफ्टपासून २१ ऑगस्ट २०१९ रोजी गोदावरी-४ चे काम चालू करण्यात आले आणि धारावीपर्यंत १,०४३ आरसीसी रिंग्स सह भुयार आकारले गेले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचा हा २९ वा भुयारीकरणाचा टप्पा आहे.
मिठी नदी खालील भुयारीकरण मेट्रो-३ प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक होते. मुंबईतील गुंतागुंतीची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याची उच्च पातळी शिवाय कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या मर्यादा यामुळे हे काम अधिकच कठीण होते मात्र आमच्या टीमने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडले याचा आनंद आहे” असे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले. यावर्षी मार्च महिन्यात गोदावरी-३ ने बीकेसी ते धारावीपर्यंत १.५ किमी डाऊन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण केले होते. बीकेसी ते धारावी पर्यंतच्या एकूण ३ किमी (अप आणि डाऊनलाइन) पैकी ४८४-मीटर भुयार सक्रिय मिठी नदीच्या पात्राखाली आहे. धारावी, बीकेसी, विद्यानगरी व सांताक्रूझ स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-५ ने संपूर्ण ८ किमी लांबीचे भुयार पूर्ण केले आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५% भुयारीकरण आणि एकूण ५९% बांधकाम पूर्ण केले आहे.