भूमिगत मेट्रो; ३चे काम धडाक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:23 AM2019-09-15T05:23:00+5:302019-09-15T05:23:07+5:30
मुंबई महानगर प्रदेशात २०२४च्या अखेरीस विविध मेट्रो मार्गांवर मेट्रो धावू लागेल.
मुंबई महानगर प्रदेशात २०२४च्या अखेरीस विविध मेट्रो मार्गांवर मेट्रो धावू लागेल. पूर्ण भूमिगत मेट्रोचा (कोलाबा-वांद्रे-सीप्झ) पहिला टप्पा २०२१ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. हा पहिला टप्पा सीप्झ ते वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत आहे. राज्य सरकारने हा विश्वास व्यक्त केला आहे.
डिसेंबर, २०२१ पासून मेट्रो २ अ (दहिसर ते डीएननगर),मेट्रो २ ब (डीएन नगर ते मंडाले) मेट्रो ४ (वडाळा-ठाणे-कासारवदावली) आणि मेट्रो ६ (स्वामी समर्थनगर- विक्रोळी) या चार मेट्रो मार्गांवर प्रायोगिकरीत्या मेट्रो धावू लागेल. मेट्रो १०(गायमुख-शिवाजी चौक) आणि मेट्रो ११ (जीपीओपर्यंत मेट्रो ४चा विस्तार) या दोन मेट्रो मार्गाचे काम या वर्षापासून सुरू होईल. एप्रिल, २०२४ पर्यंत या मार्गांवर मेट्रोची प्रायोगिक फेरी धावण्याची शक्यता आहे. हे प्रस्ताव सध्या मंत्रिमंडळाकडे मान्यतेसाठी विचाराधीन आहेत. मेट्रो ८ मार्गिकेसाठी (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) चाचणी नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सुरू होईल, असे अहवालात म्हटले आहे.
प्राधिकरण ही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनची कार्यकारी संस्था आहे. प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव म्हणाले की, आम्ही हे साध्य गाठण्यासाठी अतिशय सकारात्मकतेने काम करीत आहोत. मार्गिका ४च्या विस्तारासाठी निधी मिळावा, यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टशी लवकरच चर्चा सुरू होईल. प्राधिकरणाला या प्रकल्पासाठी एकूण ८,७३९ कोटी रुपये खर्च येणार असून, प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी १,८३९ कोटी रुपयांची अपेक्षा पोर्ट ट्रस्टकडून आहे.
दरम्यान, शहरात सध्या सहा वेगवेगळ्या मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. प्राधिकरणाने २ अ मार्गिका (दहिसर ते डीएन नगर) आणि मार्गिका ७ (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) साठी ६२ टक्के कामे पूर्ण केली आहेत. पुढच्या वर्षी, २०२० मध्ये या दोन्ही मार्गांसाठी चाचणी अपेक्षित आहे.
मेट्रो ३ भुयारी मार्गिकेवरील
सोळावा टप्पा पूर्ण
कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ भुयारी मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या सोळाव्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. तापी १ या बोअरिंग मशिनने (टीबीएम) सहार रोड मेट्रो स्थानक येथे भुयारीकरण केले. या टीबीएम यंत्राने
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ ते सहार रोड मेट्रो स्थानक हे ६८७ मीटर अंतराचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.
>मेट्रो ३च्या भुयारीकरणाचा सोळावा टप्पा पूर्ण झाला आहे. या भुयारामुळे मेट्रो ३च्या एकूण मार्गिकेवरील ३१.६८७ कि.मी. भुयारीकरण पूर्ण झाल्याने या कामाने गती घेतल्याचे दिसून येते.
>छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ येथून २२ एप्रिल, २०१९ रोजी तापी १ने भुयारीकरणाच्या आव्हानात्मक कामाला सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल २) ते सहार रोड या टप्प्यातील अप आणि डाउन अशी दोन्ही भुयारे पूर्ण झाली आहेत. मेट्रो ३ने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
>सोळाव्या टप्प्यातील
भुयारीकरण पूर्ण होण्यासाठी १०५ दिवसांचा अवधी लागला. या मार्गिकेवर कामात फारसा अडथळा आला नाही.
भुयारी टप्पा जमिनीपासून २५ मीटर खोलवर आहे. या ६८७ मीटर भुयारासाठी एकूण ४८८ सेगमेन्ट रिंग्जचा वापर करण्यात आला आहे.
>जमिनीखालून धावणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेवर एकूण २७ स्थानके असणार आहेत. भुयारीकरणासाठी सध्या १७ टीबीएम यंत्रे तैनात आहेत. टीबीएम यंत्रे उतरविण्यासाठी मार्गिकेवर मोठी विवरे खोदण्यात आली आहेत.