मंत्रालयाखाली होणार सातशे वाहनांसाठी भूमिगत वाहनतळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 05:21 AM2019-11-10T05:21:16+5:302019-11-10T05:21:24+5:30
चर्चगेटमध्ये राहणाऱ्यांना लवकरच पार्किंगच्या समस्येतून दिलासा मिळेल. कारण, दक्षिण मुंबईतील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी योजना तयार करण्यात आली
मुंबई : चर्चगेटमध्ये राहणाऱ्यांना लवकरच पार्किंगच्या समस्येतून दिलासा मिळेल. कारण, दक्षिण मुंबईतील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी योजना तयार करण्यात आली असून त्याअंतर्गत मंत्रालयाखाली भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेनुसार चर्चगेट येथील या भूमिगत वाहनतळामध्ये सुमारे सातशे वाहने उभी करता येतील.
दक्षिण मुंबईतील या वाहनतळाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडवर (एमएमआरसीएल) सोपवण्यात आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या विधानभवन मेट्रो स्थानकापासून मंत्रालय, विधानभवनपर्यंत सबवे बनवण्यात येणार आहे. मंत्रालयात मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राज्यभरातून दररोज शेकडो लोक विविध कामांसाठी येतात. येथे येणाºयांना मोठ्या पार्किंगची समस्या भेडसावते. मात्र आता येथे वाहनतळ झाल्याने त्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
>येथून धावणार मेट्रो
मेट्रो-३ मार्गिकेच्या २७ मेट्रो स्थानकांना खासगी आणि शासकीय संस्थांना जोडण्याची परवानगी एमएमआरसीएलने दिली आहे. यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेमध्ये व्यावसायिक संस्था, हॉस्पिटल्स, महाविद्यालये आणि हाउसिंग सोसायट्यांजवळून मेट्रो धावणार आहे. यामुळे मेट्रो स्थानकातून थेट संस्थांच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे.
>मंत्रालय, विधानभवनापर्यंत पोहोचणे होणार सोपे
मेट्रो-३ मार्गिकेतील विधानभवन मेट्रो स्थानक ते मंत्रालय असे सबवेने जोडण्यात येणार आहे. यामुळे मेट्रोतून प्रवास करणाºयांना सबवेतून थेट मंत्रालय आणि विधानभवनापर्यंत पोहोचता येईल. यासह सबवेला विधानभवन, मंत्रालय आणि प्रशासकीय इमारतीलाही जोडण्यात येणार आहे. यामुळे सहजतेने एका इमारतीतून दुसºया इमारतीमध्ये जाता येईल.
विधानभवन स्थानकापासून ३८० मीटर लांबीचा सबवे बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ९८ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येतील. हा सबवे बांधण्यासाठी एमएमआरसीएलने सार्वजनिक बांधकाम विभागासोबत (पीडब्ल्यूडी) करार केला आहे. एमएमआरसीएलने सबवेचे काम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.