पालिका रुग्णालयांत भूमिगत कचरापेट्या, रुग्णालयांचा परिसर दुर्गंधमुक्त करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 03:30 PM2023-06-12T15:30:10+5:302023-06-12T15:31:33+5:30

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आला निर्णय

Underground waste bins in municipal hospitals, efforts to deodorize hospital premises | पालिका रुग्णालयांत भूमिगत कचरापेट्या, रुग्णालयांचा परिसर दुर्गंधमुक्त करण्याचा प्रयत्न

पालिका रुग्णालयांत भूमिगत कचरापेट्या, रुग्णालयांचा परिसर दुर्गंधमुक्त करण्याचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरातील विविध महापालिका रुग्णालयांतील कचरा व्यवस्थापनासाठी भूमिगत कचरा पेट्यांचा वापर करण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये सदर संस्थेला या कचरा पेट्यांचा पुरवठा करणे, त्या कार्यान्वित करणे आणि त्यांची पुढील दोन वर्षांसाठी व्यापक देखभालही करावी लागणार आहे. यामुळे पालिका रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यास मदत होईल शिवाय कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीपासून रुग्णालय परिसराची सुटका होण्यास मदत होणार आहे.

मुंबईत सद्य:स्थितीत रोज पाच हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणारा कचरा देवनार, कांजूर व मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो. या ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवर ४ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, मुंबईतील या तिन्ही डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात येत असून, यातून  आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वच्छ मुंबईचे उद्दिष्ट

  • स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी २०३० पर्यंत मुंबई कचरामुक्तीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई कचरा व दुर्गंधीमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना राबवल्या. मुंबई कचरामुक्तीसाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. 
  • मात्र, आतापर्यंत कचरापेटीत कचरा टाकल्यानंतर कचरा पुन्हा रस्त्यावर येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी भूमिगत कचरा पेटी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते व इतरत्र कचरा टाकू नये यासाठी भूमिगत कचरा पेटी बसवण्यात येत आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयांत भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात आल्या आहेत.


दुर्गंधीपासून  मुक्त होणार

कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी आणि शहर स्वच्छ दिसण्यासाठी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी भूमिगत डबे बसवले होते. त्यानुसार, चित्ता गेट- फोर्टसारख्या पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या भागात डबे बसवण्यात 
आले.

तीन ठिकाणी केली पाहणी

  • गिरगाव, अक्सा आणि गोराई समुद्रकिनारा येथे डबे बसवून त्यात कचरा टाकला जातो की नाही, याची पाहणी करण्यात आली. या कचरा पेट्या बसवताना भूमिगत केबलसह अन्य अडथळ्यांचा सामना पालिकेला करावा लागतो. त्यावर मात करून पालिकेने आता रुग्णालय परिसरातील कचऱ्यासाठी भूमिगत कचरा पेट्या बसविणार आहे.
  • पालिकेकडून आताच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पावसात कचरापेट्यांची कामे करणे कठीण असल्याने प्रक्रिया ही सप्टेंबरनंतर सुरू होणार आहे.

Web Title: Underground waste bins in municipal hospitals, efforts to deodorize hospital premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई