मुंबई : कोरोनाच्या काळातही मुंबईतल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे काम वेगाने सुरू आहे. बुधवारी धारावीलगतच्या मिठी नदीखालील १.५ किलोमीटर लांबीच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. टेराटॅकनिर्मित गोदावरी-४ या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)ची यासाठी मदत घेण्यात आली. बीकेसी ते धारावीपर्यंतचे हे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५ टक्के भुयारीकरण आणि एकूण ५९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनतर्फे मेट्रो-३चे काम सुरू आहे.बीकेसी येथील लाँचिंग शाफ्टपासून २१ आॅगस्ट २०१९ रोजी गोदावरी-४चे काम सुरू करण्यात आले. धारावीपर्यंत १ हजार ४३ आरसीसी रिंग्ससह भुयार आकारले गेले.मेट्रो-३ मार्गाचा हा २९वा भुयारीकरणाचा टप्पा आहे. मार्च महिन्यात गोदावरी-३ ने बीकेसी ते धारावीपर्यंत १.५ किमी डाऊन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण केले होते.बीकेसी ते धारावीपर्यंतच्या एकूण ३ किमी (अप आणि डाउनलाइन)पैकी ४८४-मीटर भुयार सक्रिय मिठी नदीच्या पात्राखाली आहे. धारावी, बीकेसी, विद्यानगरी व सांताक्रुझ स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-५ ने संपूर्ण ८ किमी लांबीचे भुयार पूर्ण केले आहे.>मिठीखालील भुयारीकरण या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक होते. गुंतागुंतीची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याची उच्च पातळी आणि कोरोना अशा संकटकाळात हे काम करण्यात आले आहे.- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन
मिठीखालील भुयारी काम झाले पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:10 AM