मेट्रो-३ मार्गिकेतील सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलपर्यंत भुयारीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:26 PM2020-04-30T22:26:27+5:302020-04-30T23:07:22+5:30
एमएमआरसीने हा मार्गिकेतील २८वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
मुंबई : कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो -३ मार्गिकेतील सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलपर्यंत भुयारीकरण गुरूवारी पूर्ण झाले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) हे काम करण्यात आले असून एकाच टप्प्यात सलग चार किमी अंतराचे पहिलेच भुयारीकरण आहे. एमएमआरसीने हा मार्गिकेतील २८वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. एकाच टप्प्यात सलग ४ किमी अंतराचे भुयारीकरण करणारे वैतरणा -२ हे मेट्रो-३ चे पहिले टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) ठरले.
मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज- २ च्या वैतरणा २ या टीबीएमद्वारे भुयारीकरणास फेब्रुवारी २०१८ मध्ये सीएसएमटी लॉचिंग शाफ्ट येथून सुरूवात झाली होती. एकूण २७३० काँक्रेट रिंग्सचा वापर करत मेट्रो-३ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रलपर्यंतचे सर्वात जास्त अंतराचा पल्ला वैतरणा २ टीबीएम ने गाठला. यावर प्रतिक्रिया देताना मेट्रो ३ एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल म्हणाले, पॅकेज २ अंतर्गत येणारा भाग हा समुद्र किनाऱ्याला समांतर होता. तसेच यामार्गावर अनेक जीर्ण आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे.
तसेच या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी १-४ मीटर इतक्या जवळ अंतरावर होती त्यामुळे मार्गिकेतील भुयारीकरणाचा हा टप्पा सर्वात आव्हानात्मक होता. तसेच कोविड-१९ च्या साथीमुळे हे काम अधिकच आव्हानात्मक झाले होते, मात्र राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे कठोर पालन करून शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) ठेवत हे काम पूर्ण केले, असेही देओल म्हणाले.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रल दरम्यान ४ किमी भुयारीकरणाअंतर्गत सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रांट रोड आणि मुंबई सेंट्रल या पाच भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.