मुंबई - राजकारणातील चाणक्यनीती म्हणजेच साम-दाम-दंड-भेद यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या एकाधिकारशाहीला लक्ष्य केले. चाणक्यनितीपेक्षा गोबेल्सची नीती समजून घेण्याच्या सल्ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला. कारण, चाणक्याच्यावेळी निवडणुका नव्हत्या, तर ग्लोबेल्सवेळी निवडणूका होत्या, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच, निवडणुका जिंकण्यासाठी आता नीतिमत्तेची आवशक्यता उरली आहे काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सामना या दैनिकासाठी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी चौफेर चर्चा केली. तसेच संपादक संजय राऊत यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. पालघर निवडणुकांवेळी मुख्यमंत्र्यांनी चाणक्यनीती समजावून सांगितली होती. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करुन जिंकणे हीच नीती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीचा समाचार घेतला. आता देशात एक नवीन नीती सुरू झाली आहे. ग्लोबेल्स नीतीलाही ही नीती मागे टाकत आहे. देशप्रेमी आणि देशद्रोही अशी ही नीती आहे. म्हणजे केवळ सरकारच्या बाजूने बोलणारे, सरकारला समर्थन करणारे देशप्रेमी आणि सरकारविरुद्ध बोलणारे देशद्रोही, अशीच ही नीती सांगते. जर, सरकारविरुद्ध बोलल्याने आम्ही देशद्रोही ठरत असू तर आम्हीही देशद्रोही आहोतच. कारण, आम्हीही सरकारी धोरणांवर टीका करतो.
सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावेळीही तेच पाहायला मिळाले. ज्या राजकीय पक्षांनी सरकारच्या बाजूने मतदान केले, ते देशप्रेमी आणि ज्यांनी सरकारविरुद्ध मतदान केले ते देशद्रोही ?. पण, संसदेत निवडूण आलेल्या प्रत्येकास देशातील जनतेने निवडून दिले आहे, हे कदापी विसरु नका, अशा शब्दात उद्धव यांनी सरकारला ठणकावले आहे. तर पालघर निवडणुकांतील पराभव हाही शिवसेनेचा विजयच असल्याचे उद्धव यांनी म्हटले. पालघरमध्ये शिवसेनेची यंत्रणा नव्हती, शिवाय येथील बहुतांश आदिवासी भाग होता. त्यामुळे चिंतामन वगणा यांनी तेथे उभारलेले अस्तित्वच भाजपच्या पथ्यावर पडले. कारण, तेथील आदिवासींना केवळ फूल हेच निवडणुकीचे चिन्ह माहित होते, जे फक्त दिवंगत चिंतामणराव वणगा यांच्या कार्यशैलीमुळे निर्माण झाले होते, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.