- पूजा दामले, मुंबईनातेसंबंधातील दुरावा, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक नुकसान, संपत्ती जाणे, भूकंप, पूर अशा धक्क्यांमुळे मानसिक खच्चीकरण होते. या काळात व्यक्तीला मानसिक आधार देण्यासाठी जवळच्या व्यक्ती प्रयत्नात असतात, पण त्यांना योग्य मार्ग माहीत नसतो. अनेकदा व्यक्ती धक्क्यातून न सावरल्याने अलिप्त होतात. या व्यक्तींना मानसिक प्रथमोपचाराची आवश्यकता असते. प्रथमोपचारात या व्यक्तींचा मूकपणा समजून घेणे आवश्यक असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मानसिक आरोग्य सप्ताहाची यंदाची संकल्पना ‘मानसिक प्रथमोपचार’ ही आहे. कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यावर त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यापूर्वी प्राथमिक उपचार दिले जातात. या प्रथमोपचाराचा मूळ उद्देश हा त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर करणे हा असतो. मानसिक आजारांमध्येही प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. एखाद्या व्यक्तीला मानसिक धक्का बसतो, त्या वेळी त्याच्या गरजा नक्की काय आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. या गरजा पूर्ण झाल्यास काही प्रमाणात त्या व्यक्तीला मानसिक स्थैर्य मिळू शकते, असे केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार संकटांशी सामना करण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. काही जण हे संकटांशी दोन हात करून त्यातून स्वत:चा मार्ग शोधतात. पण, काही जण हे त्यातच अडकून पडतात. अशा वेळी त्या व्यक्तींना मानसिक प्रथमोपचाराची आवश्यकता असते. आपल्याकडे कोणत्याही व्यक्तीला मानसिक धक्का बसला अथवा मानसिक आजार झाल्यास तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जात नाही. पण, या व्यक्तींना मानसिक प्रथमोपचार दिले जाऊ शकतात. हे प्रथमोपचार देण्यासाठी डॉक्टरच हवा असे नाही. परिचारिका, अंगणवाडी सेविका आणि ज्या व्यक्तींना इतरांना मदत करण्याची कणव आहे असे सर्वजण हे प्रथमोपचार देऊ शकतात. कारण, या उपचारांमध्ये त्या व्यक्तीला समजून घेऊन तिच्या गरजेनुसार उपचार देण्याची गरज असते. प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तीचे संवाद कौशल्य आणि ऐकून घेण्याची चांगली क्षमता हे दोन गुण महत्त्वाचे आहेत. संकटातील व्यक्तीला एकाकी वाटणार नाही. सर्वजण त्यांच्याबरोबर आहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे. यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे डॉ. पारकर यांनी स्पष्ट केले. संवाद आणि प्रेमाच्या स्पर्शाची गरज नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, पूर परिस्थिती अथवा बलात्कारसारख्या घटनांमध्ये त्या व्यक्तींशी संवाद साधताना अतिशय सावधानता बाळगणे आवश्यक असते. कारण, अनेकदा व्यक्तींना धक्का बसल्यामुळे त्यांना त्या गोष्टी आठवायच्या नसतात. पण, हीच चूक अन्य व्यक्तींकडून होते. ‘काय झाले?’, ‘कसे झाले?’ हे प्रश्न त्यांना विचारले जातात. नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्यांना मानसिक प्रथमोपचार देताना प्रथम त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. त्याचबरोबरीने संवाद आणि प्रेमाच्या स्पर्शाची गरज असते.
खचलेल्यांचा मूकपणा समजून घ्या!
By admin | Published: October 09, 2016 3:54 AM