लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला सकाळी ११ वाजता जाहीर होईल, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते.
यंदाही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, मोबाइल ॲपमार्फत प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना व जागा वाटप, आदी माहिती मिळणार आहे. हा मोबाईल ॲपचा वापर विद्यार्थी / पालकांना करता येणार आहे. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविताना ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रणालीतून १२ वी गुण, अधिवास व राष्ट्रीयीत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता लागणारा सात-बारा उतारा, आदी आवश्यक प्रमाणपत्र / दाखले यांची पडताळणी होणार आहे.
नर्सिंग सीईटी रविवारी
सीईटी कक्षामार्फत बी.एस्सी नर्सिंग-सीईटी प्रवेश परीक्षा प्रथमच घेतली जात आहे. ११ जून रोजी ही परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.