Join us

अध्यक्षपदांसाठी युतीचे अंडरस्टँडिंग

By admin | Published: March 21, 2017 2:31 AM

पारदर्शक कारभारासाठी जनतेने निवडून दिल्यामुळे महापौरपदावर भाजपाने तुळशीपत्र ठेवले़ मात्र सत्तेच्या गादीवर बसण्याचा

मुंबई : पारदर्शक कारभारासाठी जनतेने निवडून दिल्यामुळे महापौरपदावर भाजपाने तुळशीपत्र ठेवले़ मात्र सत्तेच्या गादीवर बसण्याचा मोह काही पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांना आवरता आलेला नाही़ यासाठी ज्यांच्याविरोधात लढलो त्या शिवसेनेबरोबरच हातमिळवणी करून भाजपा नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झाली आहे. युती तुटल्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळू नये, यासाठी प्रभाग समित्यांची वाटणी उभय पक्षांमध्ये झाली आहे़ महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला़ त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली़ मात्र राज्यातील सत्ता वाचविण्यासाठी महापौरपदावरील हक्क भाजपाने सोडला़ मात्र अशा अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्यानंतरही असे सत्तेपासून दूर राहणे, भाजपा नगरसेवकांना मान्य नाही़ वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये संख्याबळ समान असूनही अध्यक्षपदावर दावा न करणे, भाजपाच्या नगरसेवकांना पटलेले नाही़ त्यामुळे किमान प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी तरी आपल्या धोरणात बदल करा, असा दबाव नगरसेवकांनी टाकल्यामुळे भाजपाने यू-टर्न घेतला़ मात्र युती तुटल्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊन हाती धुपाटणे येण्यापेक्षा प्रभाग समिती वाटून घेण्याचा निर्णय उभय पक्षांमध्ये झाला़ त्यानुसार पहिल्या वर्षी शिवसेनेकडे आठ आणि भाजपाकडे नऊ तर दुसऱ्या वर्षी शिवसेनेकडे नऊ आणि भाजपाकडे आठ प्रभाग समिती अध्यक्षपदे असा राजकीय समझोता झाला आहे़ (प्रतिनिधी)