दाजी समजून कस्टम निरीक्षकाने ठगाला पाठवले दोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:06+5:302021-06-10T04:06:06+5:30
आधी संदेश आता थेट कॉल...सावधान.. सावधान, आधी संदेश आता थेट कॉल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दाजी समजून कस्टम ...
आधी संदेश आता थेट कॉल...सावधान..
सावधान, आधी संदेश आता थेट कॉल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दाजी समजून कस्टम निरीक्षकाने ठगालाच १ लाख ९० हजार रूपये पाठविल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. ठगाने मित्राचा मुलगा आजारी असल्याचे सांगून पैसे पाठविण्यास भाग पाडले. याप्रकरणी बुधवारी पवई पोलीस ठाण्यात अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवईतील कस्टम कॉलनीत ३३ वर्षीय तक्रारदार कुटुंबियांसोबत राहण्यास आहेत. त्यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कामावरुन घरी परतत असताना त्यांना पत्नीचा कॉल आला. उत्तरप्रदेश येथील दाजीने कॉल करून मित्राचा मुलगा आजारी असल्याने पैसे पाठविण्यास सांगितल्याचा निरोप दिला तसेेेच त्यांना दोन लाखांची आवश्यकता आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर होत नसल्यानेे पैैसे पाठविण्यास सांगितले. तसेच दाजीनी तिच्या खात्यावर २ लाख रूपये एनईएफटीद्वारे पाठविल्याचे स्क्रिनशॉटही पाठवले. तसेच एनईएफटी केल्यामुळे पैसे अद्यापपर्यंत आले नसल्याचे पत्नीने नमूद केले.
त्यांनीही विश्वास ठेवून पत्नीने पाठविलेल्या गुगल पे क्रमांकावर १ लाख ९० हजार रुपये पाठवले. पुढे घरी आल्यानंतर त्यांनी दाजीने पत्नीच्या व्हॉट्सॲपवर पाठवलेले एनईएफटीचे स्क्रिनशॉट पाहिले.
तसेच संबंधित क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली असता, ठगाच्या आवाजावरून ते दाजी नसल्याचे समजले. त्याच्याकडे अधिक चौकशी करताच, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन कट केला. त्यांनी दाजीच्या क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांनी पैशांसाठी कुठलाही कॉल केला नसल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला.
त्यांनी बुधवारी पवई पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.
..
सावध रहा, पोलिसांनी केले आवाहन
बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे नातेवाईक आजारी असल्याचे सांगून मित्र-मैत्रिणीकड़ून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढत असताना, त्यापाठोपाठ ठगाने थेट कॉल करून नातेवाईक बोलत असल्याचे भासवून फसवणूक सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नका, असे पोलिसांकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे.