मुंबई : मुंबईला बदनाम करून तुम्हाला मुंबई जिंकता येणार नाही. मुंबई प्रथम क्रमांकावर असल्याचा अहवाल तुमच्या केंद्रातील सरकारनेच दिला आहे. महापालिकेची कामे काय असतात हे आधी समजून घ्या आणि मग बोला, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. नाकारलेली उमेदवारी, बाहेरचा उमेदवार लादणे आदी कारणांमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. विशेषत: वरळी, प्रभादेवी आणि दादर परिसरात स्थानिक शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपल्या वरळी येथील प्रचारसभेत खुलासा केला. उद्धव म्हणाले की, उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर मने कटू होतात. पण हा माझा निर्णय असल्याने माझ्यावर राग काढा शिवसेनेवर नको. मुंबई महापालिकेचा निकाल पुढच्या राजकारणाची दिशा बदलेल, असे सूतोवाच करतानाच वरळीत आपला विजय निश्चित आहे, असे उद्धव म्हणाले. मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी कामे करावीत. पण तुम्ही प्रचाराच्या नावाने उनाडक्या करीत आहात, मग कामे कोण करणार आहे, असा खोचक सवालही उद्धव यांनी केला. भाजपा पारदर्शकतेचा ढोल बजावत असतानाच पारदर्शकता म्हणजे काय कळाले नाही म्हणून केंद्राचा अहवाल सर्व ठिकाणी दाखवत आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. शिवाय केलेली कामे आणि दावे खोडून दाखवा, असे आव्हानही त्यांनी भाजपाला खुलेआमपणे दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केंद्र व राज्यात भाजपाचेच सरकार आहे; मग कोण खोटे बोलतोय? कोण गाढव आहे, असे सवाल करीत भाजपाला उद्धव यांनी खडेबोल सुनावले. युतीबाबतच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. त्या चर्चांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. यापुढे सेनेची वाटचाल एकट्याने होणार, असे उद्धव ठाकरे यांनी परळच्या प्रचारसभेत स्पष्ट केले. २३ फेब्रुवारीची विजयी मिरवणूक शिवसेनेचीच असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना घरी भांडी घासायला ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर विश्वास नाही, म्हणूनच मुंबईचा पाटना झाल्याचे बोलत आहेत. गुंडांना हाताशी घेऊन राज्य करणार असाल तर चुराडा करेन, असा घणाघातही त्यांनी केला. प्रभादेवीत मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीकामुंबई : भारतीय जनता पार्टीमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात आहे, भाजपा गुन्हेगारांचा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, सर्वाधिक गुंड उमेदवार शिवसेनेचे आहेत. शिवसेनेच्या ६३ उमेदवारांवर विविध गुन्हे असून, त्यापैकी ४३ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले गेल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील सभेत केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला गुंडांचा पक्ष म्हणून हिणविले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जोरदार प्रत्युत्तर दिले. महापालिका ही खासगी मालमत्ता नाही. इथले रस्ते वाईट आहेत. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडतात. पण कोणी लक्ष देत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कचरा आणि डम्पिंग ग्राउंड या मुद्द्यांवरूनही सेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईकरांना मुंबईत परवडणारे घर उपलब्ध होत नाही. पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. मात्र आम्ही हे चित्र बदलत आहोत. मी स्वत: मेट्रोचे काम सुरू केले आहे. सागरी सेतूच्या कामाच्या आदेशाबाबत पावले उचलण्यात येत आहेत. मुंबईत दीड वर्षात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे केले. मात्र यापूर्वीच्या सरकारला साधे टेंडरही काढता आले नाही.
‘आधी महापालिकेचे कामकाज समजून घ्या’
By admin | Published: February 11, 2017 3:09 AM