लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड काळात लांबणीवर पडलेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) कामाला अखेर वेग मिळाला आहे. आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत समुद्राखालून जाणाऱ्या दोन महाबोगद्यांचे काम देशातील सर्वात माेठ्या ‘मावळा’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने सोमवारपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलदगतीने होऊन मुंबईकरांचा प्रवास वेगवान हाेईल, असा पालिकेचा दावा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या महाबोगद्याच्या कामाला सोमवारी सुरुवात झाली. कोरोना विरोधातील लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरू झाली आहे. ही लढाई आपण नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या विकासात ‘मावळ्यां’ची भूमिका महत्त्वाची असेल, असेही ते म्हणाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट, एल अँड टी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष एस. व्ही. जोशी यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.१३ हजार कोटी रुपये खर्च करुन महापालिका स्वबळावर कोस्टल रोडचे काम पूर्ण करणार आहे. इतक्या मोठ्या रकमेचा प्रकल्प राबवणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यावेळी सांगितले.
वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी हे सगळेच ‘मावळे’सन २०१२-१३ च्या निवडणुकीत कोस्टल रोडचे सादरीकरण झाले. त्यावेळेस अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र आता काम प्रत्यक्षात सुरू असून, २० टक्के काम पूर्णही झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात १९९५ मध्ये युतीचे सरकार असताना मुंबईची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तब्बल ५५ उड्डाणपूल बांधले. ते कमी पडू लागले आहेत. त्यामुळे कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरेल. कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसे या कामात ‘मावळा’ यंत्राचे काम असेल. रणांगणात मावळे लढतात. पालिकेच्या या कामात आयुक्तांपासून वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, काम करणारी कंपनी, अभियंते, कर्मचारी सगळेच मावळे आहेत. त्यामुळे पालिका वेळेआधीच काम पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईतकोस्टल रोडमुळे उपनगरातील नागरिकांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट मुंबईत येता येणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. मुंबईकरांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा-सुविधा देण्यासाठी जगातून शक्य तितके सर्वोत्तम अत्याधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
समुद्राखाली ‘मावळा’ खाेदणार बाेगदेn हे अजस्र यंत्र १२.१९ मीटर व्यासाचे आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकला आहे, तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येईल. समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे मावळा खाेदेल.n डायमंड कट्टरद्वारे मोठे खडक तोडण्याचे काम हा मावळा करणार आहे. खोदकाम केल्यानंतर तयार होणारी माती तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या मातीचा दर्जा चांगला असल्यास पुन्हा प्रकल्पामध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे हाेणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.