Join us

मजुराच्या मृत्यूमागचे गूढ कायम

By admin | Published: December 22, 2016 6:42 AM

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मजुराच्या हत्येबाबत पोलिसांकडे विचारणा करताच पोलिसांनी आरोपीच्याच बाजूने मराठीत

मनीषा म्हात्रे / मुंबईतीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मजुराच्या हत्येबाबत पोलिसांकडे विचारणा करताच पोलिसांनी आरोपीच्याच बाजूने मराठीत जबाब नोंदवून घेत प्रकरण दाबल्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली आहे. हे प्रकरण ग्राहक समाजसेवा संस्थेकडे जाताच या प्रकरणी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. पतीच्या हत्येची माहिती समजल्यावर मजुराच्या पत्नीस धक्का पोहोचला आहे.मूळचे उत्तर प्रदेश येथील रानीपूर गावात राहणारे निसाद कुटुंब. पत्नी आणि ४ मुलांची जबाबदारी असल्याने खेताहू निसाद (४०) हे आॅगस्ट २०१६ मध्ये कामानिमित्त मुंबईत आले. मुलुंड पूर्वेकडील साई सिमपॉनी कन्स्ट्रक्शन साइटवर मजूर म्हणून काम सुरू केले. पत्नी रितादेवी आणि मुले गावीच होते. पती चांगल्या ठिकाणी कामावर लागला. घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल, या आनंदात निसाद कुटुंबीय होते. अशातच २२ आॅगस्टच्या रात्री खेताहूंचे पत्नीसोबत नेहमीप्रमाणे बोलणे झाले. तेव्हा अन्य मजुरांसोबत पंख्यावरून भांडण झाल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. तुम्ही काळजी घ्या, जास्त वाद घालू नका. असे बोलून पत्नीने त्यांना समजावले. मात्र हा संवाद अखेरचा असेल हे त्यांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्यानंतर सलग तीन दिवस रितादेवी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी त्यांच्या मित्रांसोबतदेखील संवाद साधला. मात्र त्या वेळी ते कोठेतरी बाहेर गेलेले असून तीन दिवस कामावर आले नसल्याची माहिती त्यांना मिळाली. हे ऐकून धडकी भरलेल्या रितादेवी यांनी मुंबईतील नातेवाइकाच्या मदतीने शोध सुरू केला. रितादेवी यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, २६ आॅगस्ट रोजी पतीचा सहकारी असलेल्या बबलूचा फोन येतो. निसाद यांचा अपघात झाला आहे. येथील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या वृत्ताने रितादेवी यांना धक्काच बसला. एकीकडे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पतीबाबत साधी हरविल्याची तक्रार करणेदेखील त्यांना योग्य वाटले नाही. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळतो. यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा संशय त्यांना आहे. ‘मी येईपर्यंत मृतदेहाची विल्हेवाट लावू नका. त्यांना शेवटचे तरी मला बघू द्या,’ अशी विनंती करूनदेखील, मृतदेह पूर्णपणे कुजला आहे. त्यातून दुर्गंधी येत असल्याने त्याची वेळीच विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तिला येण्यास नकार दिला. या वेळी तिचे दूरचे नातेवाईक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाटही लावण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रितादेवी २९ आॅगस्टला मुंबईत दाखल झाल्या. त्यांचा जबाब नोंदविण्यात येतो. मात्र या वेळी पती दारुडा असून मला नेहमीच मारहाण करतो. तो दारूच्या नशेत पडत असतो, अशा आशयाचा जबाब यामध्ये नोंदवून प्रकार मार्गी लावण्यात आला. यात दाखविण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणी विकासक आणि ठेकेदाराविरुद्ध निष्काळजीपणामुळे मत्यूस जबाबदार ठरवीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पतीचा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याच्या संशयातून तिने शोध सुरू केला. दोन महिन्यांनंतर तिची भेट ग्राहक समाज सेवा संस्थेशी झाली. ग्राहक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक म्हस्कर, सचिव शिवप्रकाश तिवारी यांना याबाबत समजताच त्यांनी या घटनेचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यांनी जबाबासह शवविच्छेदन अहवाल मिळविला. तेव्हा पोलिसांनी नोंदवून घेतलेला जबाबदेखील चुकीचा असल्याचा आरोप रितादेवी यांनी त्यांच्याकडे केला आहे. मुळात मराठी समजत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. पोलीस प्रकरण दाबण्यासाठी हत्येला निष्काळजीपणाचा ठपका देत असल्याचा दावा रितादेवी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिने केली आहे.