ED Raid in Mumbai : अंडरवर्ल्ड, दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेला नेता रडारवर? मुंबईत १० ठिकाणी ED आणि NIAचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:01 IST2022-02-15T09:59:47+5:302022-02-15T11:01:51+5:30
ED Raid in Mumbai : आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. मात्र दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुंबईमध्ये व्यापक तपास मोहीम सुरू असून, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेला एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे.

ED Raid in Mumbai : अंडरवर्ल्ड, दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेला नेता रडारवर? मुंबईत १० ठिकाणी ED आणि NIAचे छापे
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवायांबाबत आज संध्याकाळी शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेमधून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. मात्र दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुंबईमध्ये व्यापक तपास मोहीम सुरू असून, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेला एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. ईडीच्या दिल्ली आणि मुंबई येथील पथकांनी मंगळवारी सकाळपासून ही छापेमारी सुरु केली आहे.
केंद्रीय यंत्रणाचा राज्यातील नेते, मंत्री, आमदार यांच्यामागे ससेमिरा लागला असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडे तीन जण गजाआड जातील असा इशारा दिला आहे. सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला नेता ईडीच्या रडारवर आहे. अंडरवर्ल्ड आणि दाऊद इब्राहीमशी कनेक्शन असलेल्या एका व्यक्तीच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीकडून मुंबईमधये ही छापेमारी सुरू आहे. या संदर्भात एनआयएकडून गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर ईडीकडून ही कारवाई सुरू आहे.
एनआयएने दाऊदशी संबंधीत एका प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात काही मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबत माहिती समोर आली होती. त्याआधारे ईडीने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करत ही कारवाई केल्याचे समजते. ईडी याप्रकरणी इक्बाल कासकर आणि दाऊदच्या एका हस्तकाचा ताबा घेण्याची शक्यता आहे. ईडीकडून मुंबईतील दहा विविध ठिकाणी ही छापेमारी सुरू असून, त्यामधून या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काय कागदपत्रे, माहिती लागते आणि पुढे कोणत्या बड्या राजकारणी व्यक्तीचे नाव समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.