अध्यादेश लागू
मुंबई : राज्य पोलीस दलातील रिक्त पदांच्या भरतीसाठी सामाजिक, आर्थिक दुर्बल घटक (एसईबीसी) प्रवर्ग लागू ठेवण्याबाबतचा निर्णय पूर्ववत करण्यात आला आहे. गृह विभागाने त्याबाबतचा अध्यादेश बुधवारी काढला. त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
विविध पोलीस घटकांमध्ये शिपाईच्या रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घटकनिहाय जाहिरात काढण्यात आली होती. त्यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग ठेवण्यात आला होता. मात्र मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्थगिती दिल्यानंतर त्याला अधीन राहून ४ जानेवारीला ‘एसईबीसी’ प्रवर्ग रद्द करीत असल्याबद्दल अध्यादेश जारी केला. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर ७ जानेवारीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो अध्यादेश रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानुसार, गृह विभागाने भरतीत ‘एसईबीसी’ प्रवर्ग लागू असल्याबद्दलचा अध्यादेश बुधवारी जारी केला.
..........................