प्रशासनाने युद्धपातळीवर कामे केल्याने लोकल सेवा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:04 AM2019-08-07T03:04:17+5:302019-08-07T03:04:35+5:30
प्रवाशांचा दैनंदिन प्रवास झाला सुरू: रुळावर पाणी तुंबल्याने बसला होता फटका
मुंबई : दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय लोकल सेवेला ब्रेक मिळाला होता. घाट भागात दरड कोसळल्याने, रेल्वे रूळाखालील खडी वाहून गेल्याने, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने, रेल्वे रूळावर पाणी साचल्याने पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर, कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना केल्या गेल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे
प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुरू झाला आहे.
अतिवृष्टीने रेल्वे सेवा बंद झाली होती. यासह इतर पर्यायी वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचता येत नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व यंत्रणा कामी लावून मुंबईची ‘लाइफलाइन’ सुरळीत केली. मध्य रेल्वे मार्गावर ४ आॅगस्ट रोजी सीएसएमटी ते कल्याण या दरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचल्याने १२ तास लोकल सेवा ठप्प होती. ३ आॅगस्ट रोजी कुर्ला ते सायन आणि कुर्ला ते चुनाभट्टी या भागात पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. यादिवशी मध्य रेल्वे मार्ग अडीच तासाने तर, हार्बर मार्ग पाच तासांनी सुरळीत झाली. या दोन्ही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी १०२ पंपाची बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा उपसा करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.
तसेच, मध्य रेल्वे मार्गावरच घाट भागाचे दुरुस्तीचे कामही सुरू आहे. दरड कोसळण्याच्या घटनेचा बंदोबस्त करण्यासाठी लोखंडी जाळ््या लावल्या आहेत. या भागातील प्रत्येक घटनेची माहिती घेण्यासाठी ड्रोन चालविण्यात येत आहे. यासह सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी २०० होम गार्ड आणि १०३ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते विरार दरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने येथील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पंपाद्वारे पाण्याचा उपसा करून रेल्वे मार्ग सुरळीत केला. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनची कामे सुरू केली आहेत. यामध्ये नालेसफाई, रुळाची देखभाल सुरू केली आहे. सद्यस्थितीत कोकण आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी विशेष मेल
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी चार आणि सावंतवाडी ते पनवेल चार विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस ९ ते १६ आॅगस्टदरम्यान चालविण्यात येईल. ती लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ९.१५ वाजता सुटेल. सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मेल, एक्स्प्रेस ११ ते १८ आॅगस्टदरम्यान चालविण्यात येईल. ती सावंतवाडीहून सकाळी १० वाजता सुटेल. तिला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा असेल. पनवेल ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस १० ते १७ आॅगस्टदरम्यान चालविण्यात येईल. ती पनवेलहून रात्री ९ वाजता सुटेल. सावंतवाडी ते पनवेल मेल, एक्स्प्रेस या कालावधीत सुटेल. ती सावंतवाडीहून सकाळी १० वाजता सुटेल. तिला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप या स्थानकांवर थांबा दिला जाईल.
आज मुंबई, पुण्यासह अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द
मुंबई :पावसाने मध्य रेल्वेला झोडपल्याने आणि घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने ७ आॅगस्ट रोजी मुंबई ते पुणे इंटरसिटी, डेक्कनसह इतर मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-भुसावळ पॅसेंजर, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस, मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबई - सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मनमाड-दौंड मार्गाने चालविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.