Join us

नशेत असलेल्या बेरोजगाराने 200 रेल्वे पोलिसांना लावले कामाला !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 7:35 AM

मध्यरात्रीपर्यंत पोलीस कोणती संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती याठिकाणी दिसते का, याचा शोध घेत होते. तसेच या दोन्ही ठिकाणाहून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या तसेच प्रवाशांच्या सामानाचीदेखील पडताळणी यावेळी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) आणि कुर्ला रेल्वे स्थानकासह चार ठिकाणी आत्मघातकी हल्ला करण्याचा फोन करणाऱ्या जितेश ठाकूर याला जबलपूरच्या गडा पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे. तो एक बेरोजगार तरुण असून, त्याच्या हॉक्स कॉलने जवळपास २०० रेल्वे पोलिसांना अख्खी रात्र कामाला लावले. 

गडा पोलिसांनी जितेश रमाकांत ठाकूर याला शुक्रवारी ताब्यात घेतले. जबलपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल खंडेल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरला आम्ही ताब्यात घेतले असून, त्याला मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. ठाकूर हा बेरोजगार तरुण आहे. त्याने हे कृत्य नशेत केले का? याबाबत पडताळणी सुरू आहे, असे खंडेल म्हणाले. स्वतःला सैन्याचा जवान म्हणवत अभिनेता शाहरुख खान आणि नवी मुंबईतील गुरुद्वारा परिसरातही आत्मघातकी हल्ला करण्यात येणार असल्याचे ठाकूरने म्हटले होते. मुळात रेल्वे परिसरात असलेली गर्दी पाहता कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २०० अधिकाऱ्यांनी रात्रभर सर्च ऑपरेशन केले. जेव्हा ही अफवा असल्याचे उघड झाले तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. रेल्वे पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्षाला आत्मघातकी हल्ल्याचा फोन करण्यात आला होता. ज्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलिसांना देत संबंधित परिसराची तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने श्वान पथकाच्या मदतीने सीएसएमटी आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्म परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. 

मध्यरात्रीपर्यंत पोलीस कोणती संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती याठिकाणी दिसते का, याचा शोध घेत होते. तसेच या दोन्ही ठिकाणाहून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या तसेच प्रवाशांच्या सामानाचीदेखील पडताळणी यावेळी करण्यात आली.

ताब्यात घेऊन पुन्हा चौकशीआम्ही सदर तरुणाला मुंबईत आल्यावर पुन्हा एकदा त्याची कसून चौकशी करणार आहोत. विनाकारण नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम त्याने केले असून, पोलिसांचा वेळही वाया घालवला. त्यानुसार त्याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.- मेहबूब इनामदार, पोलीस निरीक्षक, सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे