बेरोजगार तरुणांची होतेय फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:10 AM2021-02-20T04:10:17+5:302021-02-20T04:10:17+5:30
सायबर पोलिसांकड़ून सावध राहण्याचे आवाहन.. सायबर पोलिसांकड़ून सावध राहण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ...
सायबर पोलिसांकड़ून सावध राहण्याचे आवाहन..
सायबर पोलिसांकड़ून सावध राहण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना टार्गेट केले जात असल्याच्या घटना डोके वर काढत आहेत. कोका- कोलासारख्या नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांच्या हाती बनावट ऑफर लेटर देत फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा प्रकारच्या ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
चेंबूर येथे राहणारे अयुब सय्यदही या टोळीच्या जाळ्यात अडकले. त्यांना कोका-कोला कंपनीच्या नावे ई-मेल आला. त्यात नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. मेलमुळे गेल्या ८ महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या सय्यदच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने ई-मेलला प्रतिसाद देताच, ‘‘त्याला नोकरी करण्यापूर्वी दिल्लीत प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना विनामूल्य विमान तिकीट आणि प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगितले होते आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
सय्यदने त्यांच्यावर विश्वास ठेवून ८ हजार ७३० रुपये पाठवले. पैसे देऊनही विमान तिकीट न मिळाल्याने त्याने पुन्हा संबंधित तरुणाला कॉल केला. त्यांचा कॉल बंद लागला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
मुंबई सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, सय्यदच्या तक्रारीनंतर तत्काळ त्याचे पैसे फ्रीज केल्यामुळे ते वाचले. अशा मेल पासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत. प्रथम कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खातरजमा करा.
प्रत्येक मोठी कंपनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर रिक्त जागांची जाहिरात दाखवते, ज्यामुळे अधिकाधिक लोक या माहितीवर पोहोचू शकतील. तसेच मोठी कंपनी कधीही सिक्युरिटी डिपॉझिटच्या रूपात पैसे मागत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
....
बनावट ऑफर लेटर...
यात तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ऑफर लेटरही देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत.
...