'दामोदर'च्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड; 'रवींद्र'पाठोपाठ १ नोव्हेंबरपासून 'दामोदर हॅाल'ही होणार बंद
By संजय घावरे | Published: October 21, 2023 10:27 PM2023-10-21T22:27:41+5:302023-10-21T22:28:50+5:30
ऐन दिवाळीपूर्वीच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांकडून राजीनामे घेतले असून, त्याबदल्यात किती नुकसान भरपाई मिळणार याची त्यांना कल्पना नाही.
संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - नूतनीकरणासाठी बंद ठेवण्यात येणाऱ्या रवींद्र नाट्य मंदिरामागोमाग परळमधील दामोदर हॅालही पुर्नबांधणीसाठी १ नोव्हेंबरपासून बंद राहणार असल्याने इथले कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. ऐन दिवाळीपूर्वीच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांकडून राजीनामे घेतले असून, त्याबदल्यात किती नुकसान भरपाई मिळणार याची त्यांना कल्पना नाही.
कोरोनानंतर नूतनीकरणासाठी दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि माटुंग्यातील यशवंत नाट्यगृह परवानगीअभावी बंद असताना मध्य मुंबईतील रसिकांचे मनोरंजन करण्याचे काम दामोदर हॅालने चोख बजावले. आता दामोदर हॉलच्या जीर्ण झालेली इमारत नव्याने बांधण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार आहे. त्यासाठी नाट्यगृह १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची वेळ आली आहे. तीन व्यवस्थापक, एक इलेक्ट्रीशियन आणि एक स्टेज सफाई कामगार दामोदर हॉलचे कंत्राटी कामगार आहेत. याखेरीज एक इलेक्ट्रीशियन आणि एक सिक्युरिटी गार्ड कायमस्वरूपी आहे. सफाई कामगार, बुकींग क्लार्क, सिक्युरीटी गार्डसची सेवा बाहेरून घेण्यात येते. डोअरकीपरना शोनुसार पैसे दिले जातात. दामोदर हॉल तोडण्यात येणार असल्याने व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांकडून राजीनामा घेतला असून, योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे, पण तो मोबदला किती दिवस पुरणार आणि त्यानंतर आमचे आणि कुटुंबाचे काय होणार? असे बरेच प्रश्न या कर्मचाऱ्यांना सतावत आहेत. याबाबत द सोशल सर्व्हिस लीगचे अध्यक्ष आनंद माईणकर म्हणाले की, शाळा आणि हॉलचा भव्य प्रोजेक्ट तयार होणार आहे. मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी हॅालची इमारत तोडून तिथे शाळा उभारून शाळेच्या जागी हॅाल बनवण्याची योजना आहे. हे करताना हॉलमधील कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा थांबवली जाईल, पण कायमस्वरूपी स्टाफचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत. त्यांना नियमानुसार योग्य नुकसान भरपाई दिली जाईल. एक महिन्याचा अतिरीक्त पगारही देण्याचा विचार आहे. काहींना तात्पुरत्या स्वरूपात कामही दिले जाईल. कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही. माणुसकीच्या नात्याने कोरोनामध्येही कर्मचाऱ्यांचा पगार कापला नव्हता.
इतकी वर्षे नाटयगृहात काम करताना रसिक आणि कलाकारांची सेवा केल्यानंतर अचानक राजीनामा घेतल्याने आता कुठे काम शोधायचे? हा यक्ष प्रश्न आहे. नवीन हॉल सुरू होईपर्यंत आम्हाला संस्थेमध्ये पर्यायी काम द्यावे. कामावरून कमी करू नये इतकीच माफक अपेक्षा आहे. दामोदर हॉलची नवीन इमारत उभी राहिल्यावर आम्ही पुन्हा त्याच जोमाने सेवा देऊ. - सुंदर परब (व्यवस्थापक, दामोदर हॉल)