मुंबई - रेल्वे विभागाकडून रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक संवर्गासाठी (आरपीसीएफ) 1117 जागांची भरती काढण्यात आली आहे. या जागांच्या भरतीसाठी तब्बल 14 लाख 71 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. म्हणजेच एका जागेसाठी जवळपास 1317 विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या 14 लाख 71 हजार अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातून आले आहेत.
देशात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची चाललेली स्पर्धा आणि वाढती बेरोजगारी यांच्याकडे पाहिल्यास कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्पर्धा परीक्षांकडे तरुणाईचा कल वाढला असून गावकडील मुलेही आज स्पर्धा परीक्षांवर जोर देत आहेत. त्यातून या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि स्पर्धा वाढली आहे. त्यातच, पोलीस भरती, सैन्य भरती आणि रेल्वे भरती यासाठीही ग्रामीण भागातील तरुण मोठ्या अपेक्षेने स्पर्धेत उतरत आहेत. नोकरीच्या जाहिरातीसाठी तरुण दैनिक वर्तमानपत्र आणि संबंधित वेबसाईटवर अपडेट असतात. नुकतेच रेल्वे विभागाकडून आरपीएफ आणि आरपीएसएफ संवर्गातील उपनिरीक्षक पदांच्या 1117 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीला तब्बल 14 लाख 71 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुरुष प्रवर्गासाठी 816 जागांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या 816 जागांसाठी 12.40 लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तर, महिला प्रवर्गातील 301 रिक्त पदांसाठी 2.31 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. रेल्वेत नोकरी मिळावी, अशी देशातील अनेक तरुण-तरुणींची इच्छा असते. त्यामुळेच, रेल्वे भरतीकडे उमेदवार नजर ठेऊन असतात. रेल्वेलाही अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने दरवर्षी अशी भरती काढण्यात येते.