गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
बेरोजगारीमुळे गुन्हे शाखेचा अधिकारी बनून ज्येष्ठांंना गंडा,
गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे खासगी फायनान्स कंपनीत कर्ज वसुली करणाऱ्या दलालाकडील नोकरी सुटली. अशात पैशांसाठी गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून त्याने ज्येष्ठाना गंडविण्यास सुरुवात केल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने बदलापूरमधून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे तक्रारदार यांना २३ जून रोजी अनोळखी व्यक्तीने कॉल करून जोगेश्वरी गुन्हे शाखेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत, त्यांचा मुलगा एका वाहन कर्जासाठी जामीन राहिल्याचे सांगितले. त्याचे दीड लाख दिले नाही, तर मारण्याची धमकी दिली. तक्रारदार यांनी भीतीने जोगेश्वरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला.
तपासात गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने त्याचा सिम कार्डसाठी दिलेला पत्ताही अस्तित्वात नसल्याचे समोर आले. पुढे तांत्रिक तपासात तो बदलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बदलापूर येथून २८ जून रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दोन महिन्यांपासून खाजगी फायनान्स कंपनीत कर्जवसुली करणाऱ्या एजंटकडे काम करीत होता. मात्र कोरोनामुळे नोकरी गेली. बनावट कागदपत्रांद्वारे त्याने सिम कार्ड मिळविले.
अशात त्याने बनावट सिम कार्डवरून ज्येष्ठ नागरिकांना हेरून गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे सांगितले. त्यानुसार, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.