Join us  

अचल समंथचे अनपेक्षित विजेतेपद

By admin | Published: November 12, 2015 12:27 AM

पाचव्या मानांकित अचल समंथ याने धक्कादायक निकालाची नोंद करताना द्वितीय मानांकित साहेब सोधीचा पराभव करून १२ वर्षांखालील वझीरानी ज्युनियर ओपन चॅम्पियनशिप टेनिस

मुंबई : पाचव्या मानांकित अचल समंथ याने धक्कादायक निकालाची नोंद करताना द्वितीय मानांकित साहेब सोधीचा पराभव करून १२ वर्षांखालील वझीरानी ज्युनियर ओपन चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेच्या मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. त्याचवेळी मुलींच्या गटात अव्वल मानांकित कुंडली मजगैने हिने अपेक्षित विजेतेपद उंचावताना द्वितीय मानांकित सिया सोधीला नमवले.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने नेरूळ येथील वझीरानी नॅशनल स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी येथे झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात सनसनाटी निकाल लागला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना अचलने तुफान खेळ करताना कसलेल्या साहेबचा सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचा धडाका लावलेल्या अचलसमोर साहेबचा काहीच निभाव लागला नाही. दुसऱ्या बाजूला संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱ्या कुंडली मजगैने हिने मुलींच्या एकेरी गटात आपल्या लौकिकानुसार धडाकेबाज खेळ केला. पहिल्या सेटमध्ये तिला प्रतिस्पर्धी सिया सोधी हिने कडवी झुंज दिली. मात्र मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना कुंडलीने पहिला सेट जिंकला आणि आघाडी घेतली. यानंतर मात्र, दुसऱ्या सेटमध्ये कुंडलीने आक्रमक खेळ करताना सियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. कुंडलीने आपला सर्वोच्च खेळ करताना ६-४, ६-२ अशा सफाईदार विजयासह जेतेपदावर कब्जा केला. (क्रीडा प्रतिनिधी)