मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २०७ मधून पत्नी सुरेखाचा अर्ज भरण्यास गेलेल्या रोहिदास लोखंडे यांना तांत्रिक अडचणीमुळे प्रभाग क्रमांक २११ मधून उमेदवारी मिळाली आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून या प्रभागातून नोसीन सलीम तांबोळी यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याचे समजताच या ठिकाणी लोखंडे यांची वर्णी लागली आहे.यावर लोखंडे यांनी सांगितले की, भायखळ्यातील कामाच्या जोरावर उमेदवारी निश्चित मिळणार होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र प्रभाग क्रमांक २०७ हा महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे पक्षाने पत्नीला उमेदवारी दिली. तरीही कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवली होती. शेवटच्या दिवशी पत्नीचा अर्ज भरण्यास निवडणूक कार्यालयात गेलो असता, पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी थांबवून ठेवले होते. तांबोळी यांच्या अर्जात तांत्रिक अडचण येत असल्याने उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवण्यास त्यांनी सांगितले.सकाळी पत्नीचा अर्ज भरल्यानंतर चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार लागलीच लोखंडे यांनी कार्यालयातून सर्व कागदपत्रे मागवली. सायंकाळी चार वाजेपर्यंत तांबोळी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यातील तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने अखेर चव्हाण यांनी लोखंडे यांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे पत्नीचा अर्ज भरण्यास गेलेल्या लोखंडे यांची लॉटरी लागली. सायंकाळी पावणेपाच वाजता लोखंडे यांनी भरलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारला. प्रश्नांची जाण असल्याने या प्रभागातील उमेदवारी स्वीकारल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
अनपेक्षितपणे पतीच्या गळ्यात उमेदवारीची माळ
By admin | Published: February 09, 2017 4:59 AM