मुंबई- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक व्यवसायात जोखीम ही असतेच. बँकिंग क्षेत्र असो किंवा व्यवसाय चढ-उतार हे येतच असतात. परंतु जर चुका प्रामाणिक असतील, तर त्या माफ करून संबंधित व्यक्तीला दुसरी संधी द्यायला हवी, असं गडकरी म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सिकॉम या कंपनीनं विजय मल्याला कर्ज दिलं होतं. त्यानं 40 वर्षांपर्यंत व्याजसकट पैसे भरले. एव्हिएशन व्यवसायात उतरल्यानंतर मल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला कर्ज चुकवता आले नाही. मल्ल्या गेली 40 वर्षे नियमित कर्जाचे पैसे फेडत होता. मल्ल्यानं इतकी वर्षे व्याजासकट पैसे भरले, परंतु फक्त त्याला काही हफ्ते फेडता न आल्यानं घोटाळेबाज कसं ठरवता येईल. विजय माल्या आणि नीरव मोदी यांनी घोटाळे केले असल्यास त्यांना तुरुंगात पाठवायलाच हवे. परंतु एखाद्या आर्थिक संकटात अडकलेल्या व्यक्तीला आपण घोटाळेबाज कसे ठरवू शकतो. अशानं अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
नितीन गडकरींच्या या विधानानं मल्ल्याच्या प्रत्यार्पणात अडचणी येणार आहेत. मल्ल्याला कधीही भारतात आणलं जाऊ शकतं. तसेच मल्ल्याच्या अटकेसाठी ‘ईडी’ आणि सीबीआय प्रयत्नशील आहेत.