मुंबई - अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकणामध्ये अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. चिपळूण आणि महाड शहरांमध्ये पूरस्थिती कायम असतानाच कोकणातील महाड तालुक्यांमधील तळीये गावामध्ये दगड कोसळून झालेल्यादुर्घटनेमध्ये ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून, या संवादामधून मुख्यमंत्र्यांनी डोंगर उतारावर आणि पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. ( "This is an unforeseen crisis!", Chief Minister Uddhav Thackeray made an important appeal to the citizens living on the hillside)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मी गेल्या चार पाच दिवसांपासून घेत आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीला काही मर्यादा राहिलेली नाही कारण अतिवृष्टीच्या पुढची वृष्टी होत आहे. अनपेक्षित असं हे संकट आहे. दरडी कोसळताहेत, पुराचे पाणी वाढतंय, नद्या फुगताहेत आणि या संकटाला आपण सामोरे जात आहोत.
या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांचा फोन आला होता. सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यानुसार आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड आणि एनडीआरएफच्या टीम मदत कार्यात उतरली आहे. आपापल्या परीने मदत आणि बचावकार्य करत आहेत. काही ठिकाणी नद्यांना आलेला पूर आणि धरणांचे पाणी सोडावे लागत असल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
हे सर्व सुरू असताना कोरोनाचं संकट कायम आहे. याच भागात कोरोनाचं संकट अधिक आहे. त्यामुळे त्याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्यानंतर काल रात्री काही जणांना वाचवण्यात यश आले. मात्र काही जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे मदत कार्य सुरू आहे. अन्य ठिकाणीही दरडी कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. तेथेही मदत कार्य सुरू आहे.
राज्यातील विविध भागात पाऊस पडत आहे. गेल्या कित्येक वर्षांत पडला नाही असा पाऊस कमी वेळात पडला आहे. हे अनपेक्षित संकट आहे. परदेशातही अशी अतिवृष्टी होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता आपल्याला हे अनुभवावे लागत आहे. या परिस्थितीत जीवितहानी होऊ न देण्याला आपलं प्राधान्य आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांनाही महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. ते म्हणाले की, राज्यात जिथे जिथे डोंगर उतारावर आणि डोंगराखाली वस्त्या आहेत. त्यांना आम्ही स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. कारण रस्ते खचत आहेत. काही ठिकाणी पूल गेलेले आहे. अशा ठिकाणी जे नागरिक राहत आहेत, तेथे राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावं. जिथे धोका निर्माण होऊ शकतो. तिथून नागरिकांना स्थलांतरीत केलं जाईल. पावसाचा अंदाज वर्तवता येतो, पण ढगफुटीचा अंदाज व्यक्त करता येत नाही. तसेच दरड कुठे कोसळेल याचाही अंदाज वर्तवता येणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.