Join us

विधिमंडळाच्या इतिहासातला दुर्दैवी दिवस!

By अतुल कुलकर्णी | Published: March 03, 2019 3:37 AM

महाराष्ट्र विधिमंडळाची फार मोठी परंपरा आहे. इथली दोन्ही सभागृहे प्रथा परंपरेवर चालतात म्हणून देशभरातील अनेक विधिमंडळ सदस्य आपले कामकाज पहायला येथे येतात.

- अतुल कुलकर्णी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाची फार मोठी परंपरा आहे. इथली दोन्ही सभागृहे प्रथा परंपरेवर चालतात म्हणून देशभरातील अनेक विधिमंडळ सदस्य आपले कामकाज पहायला येथे येतात. इथल्या अनेक निर्णयांचे दाखले अत्यंत अभिमानाने दिले जातात. ज्येष्ठ सदस्यांचा आदर हा या सभागृहाचा स्थायीभाव आहे. आजही दोन्ही सभागृहातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले तर मुख्यमंत्री देखील त्यांचा मान ठेवतात आणि त्यांना आधी बोलू दिले जाते. सभागृहात अध्यक्ष किंवा सभापतींना उद्देशून सदस्य बोलत असतील तर त्या दोघांच्यामध्ये कोणीही येऊ नये हा संकेतही या दोन्ही सभागृहात पाळला जातो. एवढी उच्च मूल्य विधिमंडळाने जपली आहेत. मात्र परवाच्या घटनेने या सगळ्या प्रथा परंपरांवर पाणी ओतण्याचे काम केले आहे. जांबूवंतराव धोटे यांनी अध्यक्षांकडे पेपरवेट फेकून मारल्याचा इतिहास जुना असला तरीही तो आजही कायमचा या विधिमंडळाला चिकटला आहे. तसेच आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या वागण्याची नोंद कायमची विधिमंडळाच्या इतिहासात नोंदवली गेली आहे. यासाठीचे कारण ठरले परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांचे वागणे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आ. प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या विषयावरुन रावते यांनी जो काही रुद्रावतार दाखवला त्याने केवळ सभापतीच नाही तर विधानभवनातील सुरक्षारक्षकापासून ते खचाखच भरलेल्या लॉबीमधील अनेक अभ्यागतही चाट पडले. आपण कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहोत, आपल्या वागण्या बोलण्याकडे जनता, पक्षाचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असतात याचे कोणतेही भान त्यावेळी त्यांच्या संतापी वागण्यातून दिसत नव्हते. आ. परिचारक यांच्या बडतर्फीचा निर्णय रद्द केला की नाही याची खात्री न करताच रावते संतापून गेले. विधानभवनातील लॉबीमधून प्रचंड जोरात आवाज चढवत ते सभापतींच्या दालनात गेले. तेथे काही महिला आमदार होत्या, अनेक पक्षाचे आमदार, अधिकारी बसलेले होते. त्यांच्या देखत सभापती रामराजे निंबाळकर यांना तुम्हाला राजे कशासाठी म्हणायचे, असाही सवाल केला. अनेक असंसदीय शब्दांचा वापर केला. तेथे असलेल्या आ. यशोमती ठाकूर यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाहेर नेले. जातानाही त्याच टिपेला गेलेल्या आवाजात बोलतच ते बाहेर गेले.सभापतींचे सुरक्षा रक्षक, शिपाई, अनेक अधिकारी हा सगळा प्रकार पाहून हबकून गेले. शिवसेनेच्या अनेक उपस्थित नेत्यांनी हे आमच्यासाठी नेहमीचेच आहे, असे सांगून स्वत:ची अगतिकता दाखवून दिली. नंतर तेच रावते शांत झाल्यावर सभापतींकडे आले, त्यांची हात जोडून माफीही मागितली. सभापतीपद हे विधीमंडळाचे सर्वोच्च पद. विधिमंडळात सभापती आणि अध्यक्ष या पदांचा मान राखण्याचे काम जर नेते आणि मंत्रीच करणार नसतील तर आम जनतेकडून काय अपेक्षा ठेवणार? सभापती जेव्हा बाहेर पडले, तेव्हा सगळे त्यांच्याकडे दयेच्या नजरेने पहात होते. सभापती, अध्यक्ष या पदांवरील व्यक्तीकडे लोक दयेच्या नजरेने पाहू लागले तर या पदांचे अस्तित्व आणि ही व्यवस्था धोक्यात येईल. रावतेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून हे अपेक्षित नाही. या सगळ्या प्रकारामुळे जे घडले त्यामुळे विधिमंडळाचे पावित्र्य पूर्णपणे मलीन झाले. अशा घटना कालौघात विसरुनही जातात पण इतिहास अशा गोष्टींची नोंद कायम ठेवत असतो. या दुर्दैवी दिवसाला राजकारण्यांनी कायम लक्षात ठेवायला हवे.

टॅग्स :विधान भवनरामराजे नाईक-निंबाळकरदिवाकर रावते