Join us

दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

By मनीषा म्हात्रे | Published: April 30, 2024 7:17 PM

भांडुप हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबीयांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सैदूननिसार अन्सारी यांच्यासह त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भांडुपच्या सुषमा स्वराज पालिका प्रसूती गृहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात प्रसूती दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्याने डॉकटरांना टॉर्चच्या प्रकशतात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली. यामध्ये एका गर्भवती महिलेच्या सिझरींग दरम्यान नवजात शिशुचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

भांडुप हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबीयांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सैदूननिसार अन्सारी यांच्यासह त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. महिलेचे दिर शाहरुख अन्सारी यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी वहिनीला नेहमीप्रमाणे तपासणीसाठी रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना त्रास वाढल्याने सायंकाळच्या सुमारास डॉकटरानी दाखल करून घेतले. रात्री ९ च्या सुमारास त्यांना अचानक ब्लिडिंग सुरू झाल्याने डॉक्टरांनी बाळाचे हार्ट रेट कमी होत असल्याचे सांगून सिझरींगसाठी घेतले. त्याच वेळेस अचानक लाईट गेली. त्यात बाळाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, वहिनीची तब्येत बिघडल्याने तिला सायन रुग्णालयात न्यायला सांगितले. तेथे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या चुकीमुळे बाळ आणि आईचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रसूती दरम्यान अचानक लाईट गेल्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच, संबंधित डॉकटर आणि कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष... -यापूर्वी देखील बाळ रडते म्हणून तोंडाला चिकटपट्टी तसेच ऑपरेशन दरम्यान कापूस महिलेच्या पोटातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मात्र, त्यानंतर संबंधित डॉकटर, कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलिसांसह संबंधितावर कारवाई करण्यात येत आहे.- जागृती पाटील, स्थानिक माजी नगरसेविका 

चौकशीसाठी समितीची स्थापना -महिला नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तपासणीसाठी आल्या. बाळ आणि त्या दोघेही नॉर्मल होते. सायंकाळच्या सुमारास त्यांना ब्लिडिंग सुरू झाले. बाळाचे हार्ट रेट ही कमी जाणवत असल्याने कुटुंबीयांना सिझरींग बाबत कल्पना दिली. मात्र  नातेवाईकांनी नॉर्मल डिलिव्हरीचा आग्रह धरत नकार दिला. त्यानंतर, बाळाचे वजन आधीच जास्त होते त्यात हार्ट रेट जास्त कमी झाल्याने कुटुंबीयांना तत्काळ सिझरिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून सिझरींगला घेतले. सिझरिंग दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचे समजले. बाळाला बाहेर काढले. त्यानंतर गर्भ पिशवी शिवत असताना अचानक लाईट गेली. दुपारीच दुरुस्त केलेला जनरेटरही चालू झाला नाही. त्यामुळे टॉर्च च्या मदतीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. ऑपरेशन दरम्यान महिलेला दोन वेळा आकडी आली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने तत्काळ सायन रुग्णालयात हलवले. तेथे प्रवासात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांच्या आरोपानंतर चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार, चौकशी सुरू आहे.- डॉ. चंद्रकला कदम, वैद्यकीय अधिष्ठाता

टॅग्स :मुंबईहॉस्पिटलडॉक्टर