मुंबईः त्या रोज संध्याकाळी फेरफटका मारायला घराबाहेर पडायच्या... मोकळ्या हवेत त्यांना प्रसन्न वाटायचं... पण, थोडं चालल्यानंतर थकवाही यायचा... वय वर्ष ९१ असल्याने ते स्वाभाविकच होतं... मग त्या एका किराणा दुकानाबाहेरच्या खुर्चीवर क्षणभर विश्रांती घ्यायच्या... ही विश्रांती आणि त्यांची ती हक्काची खुर्चीच सोमवारी जीवघेणी ठरली... जे झाड त्यांना गारवा द्यायचं, त्याच झाडाची फांदी अंगावर पडल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या आणि काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली...
मुंबईतील वाळकेश्वर इथल्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या लीला सुखी या वृद्धेच्या मृत्यूची ही करूण कहाणी कुणालाही अस्वस्थ करणारीच आहे. 'काही वेळापूर्वी त्या खुर्चीवर एक तरुण बसला होता. कुठेतरी जायचं म्हणून तो उठला आणि आजी नेहमीप्रमाणे खुर्चीत विसावल्या. त्यानंतर काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं', असा घटनाक्रम किराणा दुकानदार राजेश गुप्ता सांगतात, तेव्हा नियतीच्या अनाकलनीय खेळाचीच प्रचिती येते.
लीला सुखी यांच्यासोबत त्यांची बहीण - महालक्ष्मी नायक (८६) याही 'इव्हिनिंग वॉक'ला गेल्या होत्या. त्या थोड्या लवकर घराकडे निघाल्या, तेव्हा 'थोड्याच वेळात येते' असं लीला त्यांना म्हणाल्या होत्या. पण, महालक्ष्मी घरी पोहोचत नाहीत, तोच या अपघाताची बातमी त्यांना कळली. त्यांच्यासाठी हा धक्काच होता. जीटी हॉस्पिटलमध्ये तिला रक्ताची उलटी झाली आणि तिनं अखेरचा श्वास घेतला, असं नायक यांनी सांगितलं.
जबाबदार कोण?; महापालिका की मठ? लीला सुखी यांच्या डोक्यावर ज्या झाडाची फांदी पडली, ते अशोकाचं झाड खासगी मालमत्तेवर असल्याचं समोर आलं आहे. ही जागा श्री कावळे मठाची आहे. रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याबाबतची परवानगी महापालिकेनं त्यांना गेल्या वर्षी ३० ऑक्टोबरला दिली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबरला स्मरणपत्रही पाठवलं होतं. त्यावर, त्यांनी महापालिकेच्या कंत्राटदारालाच शुल्क देऊन हे काम करायला सांगितलं होतं. परंतु, त्यात या झाडाचा कुठेच समावेश नव्हता, असं सांगत पालिकेच्या अधिकाऱ्यानं हात वर केले आहेत.
झाडाच्या फांद्या पडून गेल्या वर्षभरात चार नागरिकांचा मृत्यू झालेला असतानाही, महापालिका याबाबत फारशी गंभीर नसल्याचंच दुर्दैवी चित्र आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त होतोय.