दुर्दैवाने नथुराम गोडसे बारामतीत जन्मला, मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:21 AM2019-06-26T06:21:11+5:302019-06-26T06:21:28+5:30
नथुराम गोडसे कायम खलनायक आहे हे खरे ; पण दुर्देवाने त्यांचा जन्म बारामतीत झाला, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला.
मुंबई : नथुराम गोडसे कायम खलनायक आहे हे खरे ; पण दुर्देवाने त्यांचा जन्म बारामतीत झाला, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. सरकार एकीकडे गोडसेच्या विचारसरणीचे समर्थन करते आणि दुसरीकडे महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५० कोटींची तरतूद करते, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे असा आरोप राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेला मुनगंटीवार यांनी मंगळवारी उत्तर दिले. मात्र त्यांच्या भाषणाचा सगळा रोख विरोधकांवर टीकेचा होता. ते म्हणाले, महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस बरखास्त करा असे सांगितले होते. तो सल्ला तुम्ही ऐकला नाही.
महागाईचा दर कमी झाला हे सांगण्यासाठी त्यांनी थेट २००९ सालच्या आकडेवारीचा आधार घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आजची राज्याची अर्थव्यवस्था २७ लाख कोटींची आहे. विकासदर ७.५ टक्के आहे असे तुम्हीच सांगता. या गतीने ७० लाख कोटी पर्यंत पोहोचण्यास २०३२ साल यावे लागेल आणि जर तुम्ही तुमचे लक्ष्य २०२५ मध्येच पूर्ण करणार असाल तर विकासदर १६.५ टक्के करावा लागेल असे सांगत किमान अंकगणित सुधारा असे सांगितले होते. त्यावर आपण अंकगणिताचे पुस्तक आणले आहे असे म्हणत मुनगंटीवारांनी पुस्तकच सभागृहात दाखवले. शिवाय आपण चौथीच्या वर्गातले शिवाजी महाराजांचा धडा असलेलेही पुस्तक आणले आहे, असे सांगत विकासदर वाढवण्यासाठी अंकगणित नाही तर महाराजांसारखी मोठी इच्छाशक्ती लागते, असे विरोधकांना ऐकवले.
गांधीजींनाही कमळाची सत्ता अभिप्रेत
चलेजावचा नारा गांधीजींनी दिला त्या ग्वॉलिया टँक मैदानात एक स्तंभ आहे, ज्याच्या सर्वाेच्च स्थानावर कमळाचे फुल आहे. त्याच वेळी गांधीजींना कमळाची सत्ता येईल, असे अभिप्रेत होते. तुम्ही त्याकडेही कायम दुर्लक्ष केले, असे सांगत पुन्हा तो स्तंभ जाऊन पहावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना केले.