युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:34 AM2022-03-21T05:34:46+5:302022-03-21T05:35:22+5:30

ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले, त्यांचे मूल्य १,५०० कोटींपेक्षा अधिक आहे.

unicorn startup anonymous assets worth rs 224 crore revealed 23 raids of it department across the country including mumbai | युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे

युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : बांधकाम साहित्याची घाऊक आणि किरकोळ विक्री करणाऱ्या युनिकॉर्न स्टार्टअप कंपनीच्या महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे शहरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील २३ ठिकाणी प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यांत २२४ कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे.  तसेच मुंबई आणि ठाणे येथील बनावट कंपन्यांचे एक ‘हवाला नेटवर्क’देखील सापडले आहे. 

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, युनिकॉर्न स्टार्टअप या कंपनीच्या पुणे आणि ठाण्यातील कार्यालये आणि संबंधित ठिकाणी ९ मार्चला छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे एक कोटींची बेहिशेबी रोख रक्कम आणि २२ लाख किमतीचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे जप्त केले. या पुराव्यांवरून, कंपनीने अनेक बनावट खरेदी, बेहिशेबी रोखीचे  व्यवहार केले  असल्याचे समोर आले आहे.

समूहाने मॉरिशसमधून खूप जास्त प्रीमियमवर शेअर्स देऊन परकीय निधी जमा केल्याचेही तपासात उघड झाले आहे. तसेच, समूहाने बोगस खरेदी आणि मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख खर्च केल्याबाबतच्या तब्बल ४०० कोटींहून अधिकच्या रकमेच्या नोंदी मिळाल्या आहेत. तसेच, २२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त उत्पन्नही समोर आले आहे. या सगळ्या पुराव्याबाबत, कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता,  त्यांनी संबंधित व्यवहारांची कबुली दिली तसेच या उत्पन्नावरील सर्व देय कर भरण्याची तयारीही त्यांनी दर्शविल्याचे प्राप्तिकर विभागाने नमूद केले आहे.

हवाला व्यवहार 

शोधमोहिमेत मुंबई आणि ठाण्यातील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काही हवाला व्यवहार होत असल्याचेही आढळले. या कंपन्या केवळ कागदावर अस्तित्वात आहेत. प्राथमिक माहितीत असेही आढळले आहे, की ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले, त्यांचे मूल्य १,५०० कोटींपेक्षा अधिक आहे.

Web Title: unicorn startup anonymous assets worth rs 224 crore revealed 23 raids of it department across the country including mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.