Join us  

गणवेश भत्त्यात अडीच पट वाढ

By admin | Published: May 06, 2016 2:50 AM

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या २० हजारांवर पोलिसांना शासनाकडून मिळणाऱ्या गणवेश भत्त्यात अडीचपट वाढ करण्यात आली आहे. आता वर्षाला तीन हजार याप्रमाणे

- जमीर काझी,  मुंबई

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या २० हजारांवर पोलिसांना शासनाकडून मिळणाऱ्या गणवेश भत्त्यात अडीचपट वाढ करण्यात आली आहे. आता वर्षाला तीन हजार याप्रमाणे दर चार वर्षांनी अधिकाऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा होतील, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.पोलीस दलातील उपनिरीक्षक ते सहायक आयुक्त/ उपविभागीय अधिकारी दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना गेल्या एक दशकापासून चार वर्षांनी केवळ ५ हजार रुपये दिले जात होते. महागाईचा विचार करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. या अधिकाऱ्यांना २००६ पूर्वीपर्यंत या भत्त्यापोटी दर चार वर्षांनी केवळ २ हजार रुपये दिले जात होते. त्यानंतर गृहविभागाने त्यामध्ये आणखी ३ हजारांनी वाढ केली. मात्र महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम तुटपुंजी असल्याने त्यामध्ये वाढ करण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून महासंचालक कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर १० वर्षांनंतर गणवेश भत्त्यामध्ये सध्याच्या अडीच पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता दरवर्षाला ३ हजार याप्रमाणे चार वर्षांसाठी १२ हजारांची एकत्रित रक्कम अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.निवृत्तीच्या ६ महिन्यांपूर्वीपर्यंत मिळणार भत्तागणवेश भत्ता आत्तापर्यंत ज्या अधिकाऱ्यांच्या सेवेला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिल्लक आहे, त्यांनाच दिला जात होता. १९८२पासून हा निर्णय घेण्यात आला होता. नव्या निर्णयानुसार ज्या अधिकाऱ्यांची सेवा सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ शिल्लक आहे, त्यांनाही गणवेश भत्ता दिला जाणार आहे. या अधिकाऱ्यांना मिळणार गणवेश भत्त्यात वाढपोलीस दलामध्ये सध्या विविध विभाग, शाखांतर्गत सहायक आयुक्त/ उपअधीक्षकांची ८२५, पोलीस निरीक्षकांची ३,९४७ पदे मंजूर आहेत. तर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांची अनुक्रमे ४,४४३ व १०,९९८ इतकी आहेत. एकूण २० हजार २१३ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, त्यांना गणवेश भत्त्याच्या वाढीचा लाभ मिळेल.