२७ शालेय उपयोगी वस्तूंमधील वह्या, पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्याचे पालिका शिक्षण विभागाकडून वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पालिकेच्या शाळांतून प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, बूट-मोजे, रेनकोट, छत्र्या, शैक्षणिक वस्तू व साहित्य अशा २७ वस्तूंचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी केले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळाच बंद असल्याने, यातील गणवेश पालिका शिक्षण विभागाकडे तयार असले, तरी अद्याप त्यांचे वाटप करण्यात आले नाही. मात्र, विद्यार्थ्यांना आवश्यक इतर शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके यांचे मात्र घरोघरी जाऊन पालिका शिक्षकांमार्फत वाटप करण्यात आले आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. यंदा शाळा सुरू नसल्या, तरी २ ऐवजी एकच गणवेश दिला जाणार असून, राज्यातील काही ठिकाणी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडचणी येऊन नये, म्हणून २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येत असून, त्यात गणवेशाचा समावेश होतो. यासाठी २७ वस्तूंच्या एकत्रित निधीची तरतूद पालिका शिक्षण विभागाला अर्थसंकल्पात करून दिली जाते. पालिका शिक्षण विभागामार्फत आवश्यक विद्यार्थी संख्येप्रमाणे गणवेशांची खरेदी करून त्याचे वाटप केले जात असल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. यंदा मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊनच्या कारणास्तव शाळा बंद आहेत. त्यातही पालिका शाळांत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे यंदा तरतूद व तयारी असूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. याउलट पालिकेतील अनेक विद्यार्थी गरजू आणि गरीब घरांतून असल्या कारणाने शालेय उपयोगी, वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप त्यांना शिक्षकांमार्फत घरोघरी जाऊन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
गणवेशाच्या ऑर्डर यंदाही शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थी आजही स्थलांतरित असल्याने त्यांचे वितरण अडचणीचे ठरणार आहे. या कारणास्तव २७ वस्तूंमधील गणवेशाचे वाटप हे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर लगेचच करण्यात येईल, अशी माहिती पालकर यांनी दिली.
........
प्राथमिक पालिका शाळा- १,०३८
माध्यमिक पालिका शाळा- १४९
विद्यार्थी संख्या - २,९६,८१५
......
शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा -
तरतूद - २०२०-२१
प्राथमिक - ८०.६४ कोटी
माध्यमिक- ३१.१८ कोटी
......