लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने माणसा-माणसात शारीरिक अंतर तयार केले असले, तरी भावनिक दुरावा निर्माण करण्यात तो सपशेल अपयशी ठरला. नात्यांतील वीण अतूट ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या असंख्य हातांची मेहनत त्यामागे आहे. टपाल विभागातील पोस्टमन हा त्यातील महत्त्वाचा घटक. या वैश्विक महामारीला न डगमगता पोस्टमन काकांनी अखंड सेवा देत भावनिक संदेशवहनाचे काम केले.
सध्या पोस्टाच्या मुंबई सर्कलमध्ये १ हजार ५६८ पोस्टमन कार्यरत आहेत. दुसऱ्या लाटेत म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने उग्ररुप धारण केले असतानाही त्यांनी अखंड सेवा देत जवळपास २५ लाख ७ हजार ९७४ पत्रे घरपोच केली. या काळात मुंबईतील सर्व २९९ टपाल कार्यालये अविरत सुरू होती. या कार्यालयांत मिळून तब्बल ८० लाख ५८ हजार ७२१ बुकिंगची नोंद झाली. त्याशिवाय मुंबई विभागाने औषधे आणि अन्य वैद्यकीय उपकरणे मिळून १८ हजार ५२२ वैद्यकीय पार्सल पोहोचवली. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईतील बहुतांश विभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यामुळे टपाल पोहोचविण्यात बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे ‘विंडो डिलिव्हरी’वर भर देण्यात आला, अशी माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.
………
९५ टक्के पोस्टमनचे लसीकरण पूर्ण
मुंबईत सध्या १ हजार ५६८ पोस्टमन कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार ३९१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ११२ कर्मचाऱ्यांचा १ डोस प्रलंबित आहे. येत्या काही दिवसांत त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
..........
कामगिरी अशी...
- २५,०७,९७४ पत्रांचे वितरण
- ८०,५८,७२१ बुकिंग
- १८,५२२ वैद्यकीय साहित्याची डिलिव्हरी
..........
मुंबईतील पोस्ट ऑफिस - २२९
एकूण पोस्टमन - १,५६८