Budget 2020: मध्य रेल्वेला सात हजार ६३८ कोटी रुपयांच्या तरतुदीचे इंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:36 AM2020-02-06T04:36:02+5:302020-02-06T04:36:43+5:30
पश्चिम रेल्वेसाठी ७ हजार ४२ कोटी, अंधेरी-विरारसाठी १५ डबा लोकल
मुंबई : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ७२ हजार २१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वेला एकूण ७ हजार ६३८ कोटींचे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ७ हजार ४२ कोटींचे प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला. यामुळे कल्याण-कसारा तिसरी मार्गिका व अंधेरी-विरार धिम्या मार्गावर १५ डबा लोकल चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
कल्याण-कसारा ६७.६२ किमीच्या तिसऱ्या मार्गिकेसाठी ५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासह अंधेरी ते विरार या धिम्या मार्गावर १५ डबा चालविण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढविण्यासाठी ५ कोटी तर सीएसएमटी ते पनवेल रेल्वे मार्गासाठी ७ कोटींची तरतूद केली आहे.
पारसिक बोगद्याच्या बांधकामासाठी ५ कोटी आणि सीएसएमटी-चुनाभट्टी सिग्नल यंत्रणेत आधुनिकीकरणासाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. जोगेश्वरी येथे टर्मिनस उभारणे, नवी दिल्ली-मुंबईदरम्यान वेग वाढवून प्रवास वेळ १२ तासांवर आणणे या प्रकल्पांवर भर दिला आहे.
सीएसएमटीला सुधारणांची झळाळी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ या फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येईल. येथे २४ डब्यांची एक्स्प्रेस थांबेल. यासाठी ४ कोटींची तरतूद आहे. सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीच्या नूतनीकरणासाठी ९.३ कोटींची तरतूद आहे. याशिवाय विक्रोळी येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी ३ कोटी आणि दिवा येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी ७ कोटी, तर दिवा-वसई रोड ओव्हर ब्रिजसाठी १३.३ कोटी आणि दिवा-पनवेल रोड ओव्हर ब्रिजसाठी ३.५ कोटींची मंजुरी मिळाली आहे.
यार्डांचे विस्तारीकरण
कसारा येथील यार्डचे विस्तारीकरण आणि मार्गिका तयार करण्यासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कर्जत यार्डचे विस्तारीकरण आणि कर्जत-पनवेल आणि कर्जत-पलासरी चौथी मार्गिका उभारण्यासाठी ३ कोटींची, तर पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनसचा पहिल्या टप्प्यासाठी ८ कोटींची तरतूद आहे.
काही महत्त्वाच्या तरतुदी
मध्य रेल्वे मार्गावरील पादचारी पूल आणि रोड ओव्हर ब्रिज बनविण्यासाठी एकूण ३५१ कोटी.
बोगदे आणि इतर कामांसाठी एकूण ९८ कोटी.
वर्कशॉपमधील विविध कामांसाठी एकूण ३३१ कोटी.
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी २९५.६ कोटी.
मुंबइतील पादचारी पुलांच्या कामासाठी ३८.५ कोटींची तरतूद
दादर, मुलुंड, विक्रोळी, टिटवाळा, आटगाव, उल्हासनगर, कसारा, आंबिवली, वासिंद, वडाळा, गोवंडी आणि टिळकनगर येथे पादचारी पूल उभारण्यासाठी ३८.५ कोटी.
मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या नूतनीकरणासाठी ३५ कोटी.
मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १३२ कोटी.
पादचारी पुलांसाठी १६.०६ कोटींची तरतूद
पादचारी पुलांसाठी १६.०६ कोटींची तरतूद आहे. लोअर परळ, प्रभादेवी, गोरेगाव, वांद्रे, वसई रोड, नालासोपारा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विरार या स्थानकांवर नवीन पादचारी पूल उभारण्यात येईल. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या फलाटांची उंची ८४० वरून ९२० मिमी करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गासाठी असलेल्या सुविधा
रेल्वे मार्गिका, दुहेरीकरणासाठी १ हजार ४०२ कोटी, फलाटांची उंची, अतिरिक्त पीट मार्गिका, एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणासाठी ५०.५८ कोटी रुपये, रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएमची संख्या वाढविण्यासाठी ६.७९ कोटी रुपये, रोड ओव्हर पुलासाठी ५०९.४ कोटी, रोड सुरक्षेच्या विविध कामांसाठी ९०१.४० कोटी, प्रवासी सुविधेसाठी २७९.७० कोटी, सिग्नल यंत्रणा आणि इतर इलेक्ट्रिक कामे पूर्ण करण्यासाठी १७८.५९ कोटी, चर्चगेट ते विरारदरम्यानचे रेल्वे रूळ बदलण्यासाठी ३७.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. रेल्वे वाहतुकीसाठी २.५ कोटींची तरतूद केली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर ३७७ एटीव्हीएम बदलून तेथे अत्याधुनिक नवीन एटीव्हीएम बसविण्यात येतील. यासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिग्नल आणि टेलिकॉमकरिता ९.८२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.