केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली उत्तर मुंबईच्या तीन विधानसभा कार्यालयांना भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: June 16, 2024 04:22 PM2024-06-16T16:22:06+5:302024-06-16T16:22:29+5:30
पालिका व पोलीस अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती राबवावी, असे केले आवाहन
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित खासदार पीयूष गोयल यांनी काल उत्तर मुंबईतील तीन भाजपा आमदारांच्या कार्यालयांना भेट दिली.तसेच त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या परिसरातील समस्या आणि सुधारणांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी उपस्थित पालिका ब पोलिस अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती राबवावी असे आवाहन केले, तसेच गरीब व दुर्बल घटकांना प्रशासनाने त्रास देऊ नये असे निर्देश त्यांनी दिले.
उत्तर मुंबईतील भाजप आमदारांच्या क्षेत्रातील विधानसभा कार्यालयांना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल पासून सुरवात केली आहे.त्यांनी काल कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर व दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी यांच्या कार्यालयला भेट दिली आणि संध्याकाळी विधान परिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयाला भेट दिली.
याभेटी दरम्यान पदाधिकारी, संघटनेचे नेते, माजी नगरसेवक आणि महापालिका आणि पोलीस अधिकारी,नागरिक उपस्थित होते.यावेळी विविध संस्थांच्या सदस्यांनी व नागरिकांनीही लेखी स्वरुपात आपल्या समस्या मांडल्या.
उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्यासाठी वेगाने पुढे जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्यासाठी निवडणूक प्रचारसभांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सुरू झाल्याबद्दल येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.