सागर परिक्रमा चर्चासत्रासाठी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री वेसावे बंदरावर येणार
By मनोहर कुंभेजकर | Published: January 4, 2023 04:18 PM2023-01-04T16:18:38+5:302023-01-04T16:18:59+5:30
येत्या १० जानेवारीला वेसावे बंदरावर मत्स्यव्यवसायाशी संबंधित योजनांच्या लाभाबाबत चर्चासत्राचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-मच्छिमारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुशोतम रुपाला हे सागर परिक्रमा योजनेच्या माध्यमातून, देशातील मच्छिमारांच्या भेटी घेत आहेत. आज पर्यन्त त्यांनी गोवा ,गुजरात ,राज्यातील मच्छिमारांच्या भेटी घेतल्या आहेत. सागर परिक्रमा ,२०२३ माध्यमातून येत्या मंगळवार दि, १० जानेवारी रोजी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुशोतम रुपाला वेसावे बंदरावर येऊन मच्छिमारां बरोबर संवाद साधणार आहेत.
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या मार्फत मत्स्यव्यवसायिकांना मत्स्यव्यवसायाशी संबंधित योजनांच्या लाभाबाबत चर्चासत्र येत्या मंगळवार दि,१० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बाजार गल्ली लगत असलेल्या वेसावे बंदरावर आयोजित केला आहे.
सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री,
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधोर मुनगंटीवार,
खासदार, आमदार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रुपरेषा ठरवुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने कंबर कसली असून वेसावे येथील स्थानिक वेसावा मच्छी.वि का स सोसायटी, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी, वेसावा मच्छिमार सह.सोसायटी, वेसावा कोळी जमात ट्रस्ट, वेसावा नाखवा मंडळ तसेच मरोळ बाजार मासळी विक्रेता संस्था आदी विविध संस्था कडे या कार्यक्रमाचा पुढाकार सोपविण्यांत आला आहे अशी माहिती मच्छिमार नेते प्रदीप टपके यांनी दिली.
वेसावे येथे आयोजित सागर परिक्रमा २०२३ कार्यक्रमात उपस्थित रहाण्या करिता मुंबई उपनगरातील सर्व मच्छिमारांना व सहकारी संस्थाना निमंत्रीत करण्यात आले आहे व तशी जबाबदारी मत्स्यव्यवसाय खात्याने आपल्या कर्मचारी वर्गांना दिल्या आहेत़, अशी माहिती वेसावा नाखवा मंडळ अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी दिली,तर सागर परिक्रमा माध्यमातून केन्द्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समोर. मच्छिमारांचे ज्वलंत प्रश्न मांडण्यांची सुवर्णसंधी मिळणार असल्याची भावना नाखवा मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी व्यक्त केली.
सागर परिक्रमा बाबत सरकारचा उद्देश काहीही असला तरी, मच्छिमार समाजाचे प्रश्न सुटले तरच सागर परिक्रमा योजना यशस्वी झाली असे आम्ही समजू असे मत वेसावा नाखवा मंडळाचे माजी अध्यक्ष पराग भावे यांनी व्यक्त केले.