"किमान घरात मातृभाषेत बोला, नाहीतर..."; मुंबईत अमित शाहांचे महत्त्वाचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 11:03 PM2024-09-08T23:03:01+5:302024-09-08T23:07:02+5:30
मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मातृभाषेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अमित शाह हे मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी बोलताना मातृभाषेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. तसेच बॉम्बे नको मुंबई हवं ही मागणी ज्यावेळी केली त्यावेळी मी देखील बॉम्बे नको मुंबई हवी म्हणणारा होतो. त्यावेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की हे शहर मुंबई आहे, असेही अमित शाह यांनी म्हटलं. नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की याला प्रचंड विरोध होईल, मात्र आम्ही तरी देखील हा निर्णय घेणार आहोत", असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत आगमन झालं. मुंबईत लालबागचा राजा गणपतीचे दर्शन अमित शाह घेणार आहेत. त्यानंतर महायुतीच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिगृहावर जातील. त्याआधी अमित शाह यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी मातृभाषेबाबत महत्त्वाचे विधान केलं.
"माझं म्हणणं आहे की, किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोललं पाहिजे. जर तुम्ही हे केलं नाही तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. कारण जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही तर त्याचं आजोबाशी नातं जुळणार कसं? घरात सध्या आई वडिलांना वेळ मिळत नाही. हा वेळ फक्त आजी आजोबांना असतो. त्यामुळे मातृभाषा येणं गरजेचं आहे," असं अमित शाह म्हणाले.
यावेळी अमित शाह यांनी पारशी समाजाच्या कार्याचाही उल्लेख केला. "अल्पसंख्याक समाजाच्या विषयासाठी धडपडणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की, अल्पसंख्याक समाजामध्ये देखील अल्पसंख्याक समाज आहे. तो म्हणजे पारसी समाज. या समाजानेच फक्त कोणत्याही मागण्या न करता समाजाची सेवा केल्याचे पाहायला मिळत आहे. मग ते टाटा असोत की होमी भाभा असो त्यांनी मोठं योगदान केल आहे," असं अमित शाह म्हणाले.