केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी महाराष्ट्रात येत आहेत. ते भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील तसेच मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील.
या दौऱ्यातील शाह यांची पहिली भाजपची बैठक नागपुरात मंगळवारी दुपारी होईल. सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. रात्री महायुतीच्या नेत्यांची वेगळी बैठक घेतील. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील.
कोअर कमिटीची बैठक
शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी रात्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली. शाह यांच्याशी भाजप उमेदवार निश्चितीसंदर्भात चर्चा होणार आहे, त्याची तयारी आजच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्वनी वैष्णव, फडणवीस, बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित होते. त्या आधी विधानसभा निवडणूक समितीची बैठक झाली.