Join us

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 12:28 PM

अमित शहा मुंबईत दाखल, लालबागच्या राजाचे घेणार दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. काल सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा झाली. या जाहीर सभेनंतरअमित शहा आज मुंबई दाखल झाले असून त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर दुपारी ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. 

आज सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर अमित शहा यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. तर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अभिनेते आदेश बांधेकर यांनी अमित शहा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सिद्धिविनायकाचे दर्शन झाल्यानंतर अमित शहा राजभवनकडे रवाना झाले. त्यानंतर दुपारी ते लालबागच्या राजाचेही दर्शन घेणार आहेत. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

दरम्यान, काल झालेल्या सोलापूरातील सभेत अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत फक्त घराणेशाही जोपासली. मुलगा, मुलगी, पुतण्या यांचेच भले झाले आहे. जलसिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. आदर्श घोटाळ्यामुळे सैनिकांचे नुकसान झाले. भाजपाचे दरवाजे आम्ही थांबविले आहेत. जर उघडले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही, असा दावा अमित शहा यांनी केला. तसेच, सभेत उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  

टॅग्स :गणेश महोत्सवमुंबईसिद्धिविनायक गणपती मंदिर