मुंबई - Amit Shah in Mumbai ( Marathi News ) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह रविवारी रात्री अचानक मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्या बहिणीवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमित शाह रात्री ९.३० वाजता मुंबईत पोहचले. मुंबईत पोहचल्यानंतर ते थेट गिरगाव येथील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीची विचारपूस करण्यासाठी गेले. अमित शाह मुंबईत दाखल झाल्याचे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रात्री हॉस्पिटलमध्ये पोहचले होते.
शाह आणि मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमध्ये येताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. याठिकाणी अमित शाह यांनी बहिणीच्या उपचाराबाबत माहिती घेतली. त्याचसोबत डॉक्टरांशी पुढील उपचारावर चर्चा केली. रात्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. शाह हे जवळपास २ तास हॉस्पिटलमध्ये बहिणीसोबत होते. हा त्यांचा पूर्णपणे खासगी दौरा होता. त्यानंतर ते हॉस्पिटलमधून निघाले. याठिकाणी हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांना भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीही हजर होते. शाह अचानक मुंबई दौऱ्यावर आल्याने हॉस्पिटल परिसरात सुरक्षा वाढवली आणि वरिष्ठ अधिकाही हॉस्पिटलमध्ये पोहचले.
शाह यांचा खासगी दौरा असल्याने ते कुणालाही न भेटता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. अमित शाह मुंबईत आल्याची माहिती कुठल्याही भाजपा पदाधिकारी अथवा नेत्यांना दिली नसल्याचेही समोर आले. रुग्णालयाबाहेर गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे याठिकाणी केवळ १०-१५ मिनिटांसाठी आले त्यानंतर शाह यांच्या बहिणीची विचारपूस करून ते निघून गेले. दरम्यान अमित शाह ९ जानेवारीला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. निमलष्करी दल, विविध सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची बैठक होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी जम्मूच्या पूंछ इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.