उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:26 PM2022-09-05T14:26:12+5:302022-09-05T15:17:38+5:30
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतले.
गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. वर्ष २०१४ मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट देखील अमित शाह यांनी यावेळी केला.
भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे.
Union Home Minister Amit Shah chairs a meeting of BJP MPs, MLAs, MLCs and corporators with respect to the upcoming BMC elections, at the residence of Deputy CM Devendra Fadanvis in Mumbai. pic.twitter.com/ZhVabKCGEL
— ANI (@ANI) September 5, 2022
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आलेत. परंतु मुंबईचं महत्व कसं कमी होईल? मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं. मुंबईतील अनेक कार्यालयात अहमदाबादला नेले. याचा अर्थ मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु महाराष्ट्राने सातत्याने यावर मात केली आहे असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.
शिवसेना निवडणुकीच्या मैदानात दिसेल-
सामना अग्रलेखातून भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख केल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी आम्ही तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का? असा चिमटा शेलारांनी काढला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर देत सांगितले की, शिवसेना कुठली सेना हे निवडणुकीच्या मैदानात दिसेल. महाराष्ट्र विरोधक असो वा आशिष शेलारांना शिवसेना काय आहे ते स्पष्ट दिसेल असं म्हटलं आहे.