Maharashtra Political Crisis: अमित शाह इन अॅक्शन! शिंदे-भाजप सरकार येताच मुंबई दौरा; BMC निवडणुकीची रणनीति आखणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:53 PM2022-08-28T12:53:32+5:302022-08-28T12:53:49+5:30
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, अमित शाहांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून केलेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने सक्रीय होत सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि शिंदे गटाला पाठिंबा दर्शवत नवे सरकार स्थापन केले. यानंतर आता दिल्लीतून राजकीय हालचाली वाढल्या असून, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यानंतर भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आक्रमकपणे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची लढाई लढण्यासाठी अमित शाह जातीने मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह गणेशोत्सवाच्या काळात ५ सप्टेंबर रोजी मुंबईत एक दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार
अमित शाह आपल्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर अमित शाह हे मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षाच्या अखेरीस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा गणेशोत्सवाच्या काळातील दौरा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे.