Narayan Rane: 'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 06:16 PM2022-05-16T18:16:24+5:302022-05-16T18:26:00+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई- १४ मे रोजी फार मोठा गवगवा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. ही सभा शक्तीप्रदर्शन करण्यासाठी घेतली, पण सभा किती भरली आणि त्याला खर्च किती आला, याचा अंदाज नागरिकांना आला असल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. तसेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायची देखील लाज वाटते, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला आहे. अपयशी ठरल्यावर यांना हिंदुत्व आणि मुंबई आठवते, असं सांगत भाजपामुळे शिवसेनेचे आमदार निवडून आल्याचा दावाही नारायण राणेंनी यावेळी केली. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंचं भाषण बोगस होतं. तसेच भाजपावर उद्धव ठाकरेंनी टीका करणं सोडावं, असंही नारायण राणे म्हणाले. यांच्या हृदयात राम आहे की रावण? हे रामही नाही रावणही नाही. यांच्याकडे विकृत बुद्धीची लोक आहेत, असं नारायण राणे म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता, मात्र तुम्ही तुमचा जरा चेहरा आरशात बघा, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला आहे.
तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केली. मात्र मुख्यमंत्रिपद घेऊनही काम करत नाही. अधिवेशनमध्ये जात नाही. मंत्रालयात जात नाही, असे कसे मुख्यमंत्री, असं नारायण राणे म्हणाले. तसेच बढाया मारु नका, अंगाशी येईल, असा इशारा देखील नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या या टीकेला आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप प्रदेश कार्यालय, मुंबई येथील पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/wMAX2pVduq
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 16, 2022