“२०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल”; अनुराग सिंह ठाकूर यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:55 PM2024-01-10T12:55:16+5:302024-01-10T12:55:49+5:30

Anurag Singh Thakur News: श्रीरामाची पूजा म्हणजेच राष्ट्रपूजा असून, सबका साथ सबका विश्वास या संकल्पनेतून रामराज्य स्थापन करायचे आहे, असे अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

union minister anurag singh thakur said india will fulfill its pledge to become a developed country by 2047 | “२०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल”; अनुराग सिंह ठाकूर यांना विश्वास

“२०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल”; अनुराग सिंह ठाकूर यांना विश्वास

Anurag Singh Thakur News: अनेक क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. अल्पावधीतच अनेक क्षेत्रात मोठे काम सरकार करत आहे. देशात नवनवे कीर्तीमान स्थापित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाबरोबरच आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे. आत्मनिर्भर भारतातून विकसित नवा भारत निर्माण करायचा  आहे. २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण  तथा क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. 

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला सुरु आहे. त्यात ‘रामपूजा ते राष्ट्रपूजा’ या विषयावर अनुराग सिंह ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारताचा अमृतकाळातून स्वर्णिम काळाकडे प्रवेश सुरू आहे, सोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. सर्व धर्म, जाती, संप्रदाय यांना जोडून सबका साथ सबका विश्वास या संकल्पनेतून रामराज्य स्थापन करायचे आहे. राम हे एकात्म आणि मानवतावादाचे प्रतीक आहेत. श्रीरामाची पूजा म्हणजेच राष्ट्रपूजा आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे

गरीब-वंचितांच्या कल्याणासाठी गेल्या ९ वर्षांत खूप काम झाले आहे. हे श्रीरामाच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे. मोदी यांनी सांगितलेले ९ आग्रह आणि पंचप्रण ही राष्टपूजाच आहे त्याचे सर्वांनी अनुसरण करावे, असे आवाहन करताना, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भारताचे पुनर्निर्माण होत आहे. आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही काळात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था निश्चितच बनेल, असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला.

देश पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज 

भारताला विकसित भारत बनवायचे आहे. यातूनच राष्ट्रपूजा होणार आहे. आयोध्येत राममंदिर पूर्णत्वाकडे जात आहे. ते येत्या २२ जानेवारीला खुले होणार आहे. देश पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज आहे. तमाम भारतीयांचे स्वप्न आता लवकरच साकारणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच २०१४ पर्यंत भारतात ६५ टक्के लोकसंख्या ही उघड्यावर शौचाला जात होती. केवळ तीन कोटी जनतेला नळाद्वारे पाणी येत होत. सुमारे ५० टक्के जनतेचे बँकेत खाते नव्हते. ही उणीव वर्तमान केंद्र सरकारने भरुन काढली. ७४ वरुन १५० विमानतळे झाली. एक हजार शंभर विद्यापीठे झाली, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

दरम्यान, जगावर नजीकच्या काळात सर्वांत मोठे संकट कोसळले ते कोरोनाचे. भारताने त्यातून उभारीच घेतली नाही तर जगाला मदत केली. आधी लसी आयात करणाऱ्या भारताने कोरोना काळात दोन लसींची निर्मिती केली. संपूर्ण देशाला सुरक्षित केलेच, इतर देशांनाही  कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला, असे ते म्हणाले.
 

Web Title: union minister anurag singh thakur said india will fulfill its pledge to become a developed country by 2047

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.