लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रंक असो वा राव मुंबई महानगरात आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे जो तो आपापल्या परीने मुंबईत घर घेण्यासाठी धडपडत असतो. या सर्वांचे आशास्थान म्हणजे म्हाडा.म्हाडाच्या योजनेतील घरे तुलनेने स्वस्त असल्याने या योजनेतील घरांवर सर्वांच्या उड्या पडतात. त्यात लोकप्रतिनिधींचाही अपवाद नाही. नुकतेच म्हाडाने ४,०८२ घरांसाठी अर्ज मागवले असून, त्यात केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्यासह अनेक दिग्गजांच्या अर्जांचा समावेश आहे.
म्हाडाच्या लॉटरीत लोकप्रतिनिधींसाठीही घरे राखीव असून, भागवत कराड यांनी ताडदेव येथील साडेसात कोटी रुपये किंमत असलेल्या घरासाठी अर्ज केला आहे. शिवाय आमदारांच्या अर्जांमध्ये आमशा पडवी, माजी आमदार हिरामण वरखडे, आमदार नारायण कुचे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा अर्जांचा समावेश आहे. दुसरीकडे गोरेगाव पश्चिमेकडील पहाडी गोरेगाव येथील घरांसाठीही मोठ्या संख्येने अर्ज आले असून, या आकड्याबाबत मात्र म्हाडाकडून माहिती देण्यात आलेली नाही. २४ जुलैदरम्यान कोणत्या परिसरासाठी किती अर्ज आले? हे स्पष्ट होईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या विक्रीची संगणकीय सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनामत रकमेचा भरणा केलेल्या १ लाख २२ हजार २३५ अर्जांचा समावेश आहे. यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत तर १४ हजार ९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. अशाप्रकारे अद्यापपर्यंत १ लाख ६ हजार ७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत सहभाग घेणार आहेत.