Join us  

शिवसेना अन् सदा सरवणकरांच्या वादात आता नारायण राणेंची एन्ट्री; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 1:15 PM

नारायण राणे आज सदा सरवणकरांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

मुंबई- मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता. यानंतर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. 

शिवसेनेकडून करण्यात आलेले आरोप सदा सरवणकर यांनी फेटाळले आहे. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं. तसेच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो, असंही सदा सरवणकरांनी सांगितलं. 

सदा सरवणकर आणि शिवसेना यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एन्ट्री घेतली आहे. नारायण राणे आज सदा सरवणकरांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सदर प्रकरण झाल्यानंतर दूसऱ्या दिवशीच नारायण राणे सदा सरवणकरांच्या घरी भेटीसाठी गेल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे. 

दरम्यान, मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी बदनामीला कामातून उत्तर देऊ. मी कामं करून आमदार झालो आहे, असं सदा सरवणकर म्हणाले. गणपती विजर्सनादिवशी जे झालं ते तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. सोशल मीडियाला सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं. घरी जाऊन मारहाण करणं योग्य नाही, असंही सदा सरवणकर यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप-

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडल्यानंतर हे सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक करत, शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संयम बाळगण्यास सांगितले असल्याचे या शिवसैनिकानी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले. 

...तर खरी शिवसेना दाखवून देऊ- खासदार अरविंद सावंत

सदर प्रकरणानंतर आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले होते. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. त्याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली. तसेच योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवून देऊ, असा इशारा देखील अरविंद सावंत यांनी यावेळी दिला. तक्रार करण्यासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे?, असा सवाल अरविंद सावतं यांनी उपस्थित केला. शिंदे गटाकडून गुंडागिरी सुरु आहे. सोशल मीडियावरुन शिवसेनेची बदनामी केली जातेय, असा दावाही अरविंद सावंत यांनी यावेळी केला.

टॅग्स :सदा सरवणकरनारायण राणे