एकनाथ शिंदे, भाजपाच्या केसाला जरी धक्का लागला, तर...; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंना थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:57 PM2022-09-22T16:57:14+5:302022-09-22T17:00:33+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला इशारा दिला आहे.
मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याआधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत. आता मेळावा घेताय. तसेच उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला?, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री, ते कुठेही जातील, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला.
मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे, यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, अशी टीकाही नारायण राणेंनी केली. तुम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काही केलं का?, असा सवाल उपस्थित करत आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, असा निशाणा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला.
खोका, गिधाडं बोलतात, उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणेंनी झोड झोड झोडपले
नारायण राणे पुढे म्हणाले की, भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् सहकाऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर, महाराष्ट्रात तुम्हाला फिरु देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. तसेच भाजपाच्या कोणत्याही नेत्यांवर टीका केली, तर जसास-तसे उत्तर देणार नाही, तर कायमचे बोलणं बंद करु, असा इशारा देखील नारायण राणेंनी यावेळी दिला.
दरम्यान, हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या अन् आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जमीन दाखविण्याची भाषा करीत आहात, आम्ही तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दिले. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिंदे मिंधे झाल्याची टीका-
वेदांतबाबत धादांत खोटे बोलत आहात, धारावीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गेले. कोणाची बाजू घेऊन बोलत आहात? होय महाराजा, म्हणत दिल्लीचे मिंधे झाला आहात, असा हल्लाबोल ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला. सगळे मिळून शिवसेनेला संपवायला निघाले आहेत, सोबत मुन्नाभाई (राज ठाकरे) घेतला आहे. शिवसैनिकांमध्येच रक्तपात घडवायचा अन् स्वत: साफ राहायचे, असे भाजपचे चालले आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.