मुंबई- राज्यात ईडीच्या कारवायांवरून वादंग असतानाच आता ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानं खळबळ माजली आहे. ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या मालकीच्या या सदनिका होत्या. हमसफर कंपनीकडून विनातारण पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं होते. याच प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.
ईडीच्या या कारवाईवरून राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे पुढे म्हणाले की, आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच, असा निशाणा नारायण राणे यांनी साधला आहे.
उद्धव ठाकरेंना झोप लागणार नाही– किरीट सोमय्या
पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या बँक खात्यातून पुढे कुणाला पैसे ट्रान्सफर झाले. त्याची माहिती जनतेसमोर आल्यास उद्धव ठाकरेंची झोप उडेल. पुढील काळात सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब होणार असं त्यांनी सांगितले.