दर महिन्याला उद्धव ठाकरेंना २५ लाख कोण द्यायचे?; नारायण राणेंचा नावासह मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:52 PM2023-09-04T15:52:15+5:302023-09-04T15:53:10+5:30
तसा शिवसैनिक आज नाही. आज कोणाच्या कानफाडीत मारायची ताकद नाही. उद्धव ठाकरेंना कुणीही काहीही बोलतात असा टोला लगावत राणेंनी मोठा दावा केला.
मुंबई - माझ्याकडे १०५ प्रकरणे आहेत. मी पुराव्यासह बोलतो. माणसांनाही उभे करेन कुणी पैसे दिले. आम्ही जे काही केले ते पक्षासाठी केले. कोविडच्या काळात राज्यात औषधे खरेदी, लस खरेदीत १५ टक्के कमिशन घेणारे कोण होते? बैठक कुठे झाले, कोणाची कंपनी होती. त्या कंपनीच्या मॅनेजरला मी भेटलोय. तोंड उघडायला तुम्ही संधी देताय. कुठल्या दिवशी कुणाला काय पोहचवले हे आम्हीपण पाहिलंय. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.
गजानन किर्तीकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राणे म्हणाले की, आमचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत गेले, खोक्याचा आरोप केला जातो. या लोकांनी खोके घेतले असतील. एवढे पैसे कमावले असतील तर उद्धव ठाकरेंनी काय केले? आज ज्या सभागृहात हा कार्यक्रम होतोय, ते हॉटेल आधी सहाराने घेतले. पहिल्या कामगारांना काढा आम्ही जुन्या कर्मचाऱ्यांना घेणार नाही असं नवीन मालकाने म्हटलं. १४० कामगार मराठी होते. ते काढणार कसे? मग या कामगारांवर दडपण आणले गेले. उद्धव ठाकरेंनी काही शिवसैनिकांना सांगितले आणि त्या हॉटेलमध्ये दगडफेक करा म्हटलं. त्या कामगारांना माझ्याकडे येऊ द्या असं केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एका कामगारामागे ४ लाख अशा १४० कामगारांमागे कोट्यवधी रुपये घेतले आणि तडजोड केली. त्यामुळे १४० कामगार बेकार झाले. हे सगळे मराठी कर्मचारी होते असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत एअर इंडिया तिथे भारतीय कामगार सेना, उद्धव ठाकरेंना महिन्याला किती रुपये मिळायचे हे किरण पावसकरांनी सांगावे. माझे तोंड उघडू नका, महिन्याला २५ लाख रुपये उद्धव ठाकरेंना मिळायचे. एअर इंडियाचे मॅनेजर हरिहरण यांच्याकडून दिले जायचे. आम्ही सगळ्यांनी रक्त सांडले शिवसेना वाढवली. बाळासाहेबांच्या तोंडून शब्द निघाला तर आम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोप लागत नव्हती. एवढे सगळे केल्यानंतर माझ्याप्रमाणे, एकनाथ शिंदे, त्यांचे सहकारी सगळे बाहेर आलेत. आज मला यांना भेटून आनंद वाटतो. मला त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तसा शिवसैनिक आज नाही. आज कोणाच्या कानफाडीत मारायची ताकद नाही. उद्धव ठाकरेंना कुणीही काहीही बोलतात असा टोला लगावत राणेंनी मोठा दावा केला.